मुंबई : काही सत्यघटना आणि प्रसंगांवर भाष्य करणारे चित्रपट साकारण्याकडे बऱ्याच चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचा कल आहे. मुख्य म्हणजे या साऱ्यामध्ये युद्धपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. अशाच काही युद्धपटांमध्ये भर पडली आहे ती म्हणजे अभिनेता अक्षय कुमारची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या 'केसरी' या चित्रपटाची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतिहासातील एक विस्मृतीत गेलेलं युद्ध आणि त्याभोवती फिरणाऱ्या कथानकावर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार असून, नुकतच त्याचं चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं. याच निमित्ताने अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केल्याचं पाहायला मिळालं. 


केशरी रंगाची पगडी, दाढी-मिशा, डोळ्यात कमालीचा आत्मविश्वास असा एकंदर लूक असणारा फोटोही त्याने सोबत जोडला. 'चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. अभिमानाने उर भरुन येईल अशा अद्वितीय चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी तयार राहा....', असं लिहित २१ मार्चला 'केसरी' प्रदर्शित होणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. 



खिलाडी कुमारसोबतच या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा हिसुद्धा झळकणार असून तिनेही चित्रीकरणादरम्यानचा एक फोटो पोस्ट केला. 'नेहमीच युद्धपट पाहतेवेळी त्यात अनेकांच्या प्रेमकहाण्यांनी माझं लक्ष वेधलं. आणि अशाच एका चित्रपटाचा भाग होण्याची संधी मिळाल्याचा मला प्रचंड अभिमान आहे', असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं. 



खिलाडी कुमारसोबत परिणीती शीख समुदायातील महिलेच्या रुपात दिसत असून तिच्या लूकमध्ये असणारा साधेपणाच त्याचा अधिक उठावदार करत आहे. त्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी एक परवणी ठरणार असल्याचं चित्र आहे. अक्षय यात १८९७ मध्ये अफगाणी सैन्यासोबत झालेल्या युद्धात शीख रेजिमेंटचं नेतृत्व करणाऱ्या हवलदार इशर सिंग यांची व्यक्तीरेखा साकारत आहे.