मुंबई : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून गुरूवारी जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे आत्मघाती हल्ला घडवण्यात आला. ज्या हल्ल्याचा फक्त भारतातूनच नव्हे, तर साऱ्या जगातून निषेध करण्यात आला. कला आणि क्रीडा विश्वातही याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्री शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी महत्त्वाचा निर्णय घेत पाकिस्तानमध्ये आयोजित कार्यक्रमाचं आमंत्रण असूनही तेथे न जाण्याची भूमिका घेतली. तर, पाकिस्तानशी सांस्कृतिक देवाणघेवाण थांबवा अशी मागणी शबाना आझमी यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी कलाविश्वातील वरिष्ठ मंडळींच्या या भूमिकेची अनेकांनीच दाद दिली. पण, 'मणिकर्णिका....' फेम अभिनेत्री कंगना रानौत हिने मात्र या भूमिकेवरुन त्यांना निशाण्यावर धरलं. 'डीएनए'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कंगनाने शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना देशद्रोही म्हणून संबोधलं. ''सांस्कृतिक देवाणघेवाण थांबवण्याची मागणी करणाऱ्या  याच लोकांनी, 'भारत तेरे तुकडे होंगे गँग'ला दुजोरा दिला होता. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातलेली असतानाही त्यांनी कराचीत कार्यक्रमाचं आयोजन का केलं?'', असं म्हणत, 'आता ते या प्रकरणातून स्वत:चा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत का?' हा थेट प्रश्न उपस्थित केला. 


चित्रपटसृष्टीत शत्रूंचं समर्थन करणाऱ्या देशद्रोहींची संख्या जास्त आहे असं म्हणणाऱ्या कंगनाचा रोख शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्याकडेच होता. सध्याची वेळ ही या साऱ्या चर्चा करण्याची नसून पाकिस्तानचा नायनाट करण्याची आहे हीच बाब तिने मांडली. 


पुलवामा हल्ल्याचा निषेध करत कंगनाने तिच्या 'मणिकर्णिका' या चित्रपटाला मिळालेल्या यशाच्या निमित्ताने आयोजित केलेली पार्टीही रद्द करण्याचा निर्णय घेतला. 'पाकिस्तानने फक्त आपल्या देशाच्या सुरक्षिततेवरच आघात केला नसून, आपल्या स्वाभिमानावर घाला घातला आहे. धमकावलं आहे. त्यामुळे आता यावर कठोर पावलं उचलली गेलीच पाहिजेत. नाहीतर आपल्या मौन राहण्याचा गैरसमज करुन घेण्यात येईल. आज भारतावर आघात झाला आहे. सध्याच्या घडीला शांततेचं वक्तव्य करणाऱ्यांच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे, गाढवारून त्यांची धिंड काढली पाहिजे, भर रस्त्यात त्यांच्या कानशिलात लगावली पाहिजे' असं म्हणत ही वेळ शांत राहण्याची नाही अशी आक्रमक भूमिका तिने मांडली.