मायभूमीसाठी प्राणांची आहूती मागणाऱ्या `पानिपत`च्या युद्धाची झलक पाहा
चित्रपटाच्या ट्रेलरमधून गतकाळाची सफर
मुंबई : पानिपतच्या युद्धाचा थरार आणि १७६१चा काळ साकारत मराठा साम्राराज्यातील एका अतिशय महत्त्वाच्या प्रसंगावर बॉलिवूड चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 'पानिपत- द ग्रेट बेट्रेयल' असं नाव असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
'मराठा भारतीय भूमीवरील असे योद्धे ज्यांच्यासाठी त्यांचा धर्म आणि कर्म हेच त्यांचं शौर्य आहे', अशा दमदार शब्दांनी 'पानिपत'च्या ट्रेलरची सुरुवात होते. पेशव्यांच्या कुटुंबात मानापमान, कुटुंबाची परंपरा, हक्क या मुद्यांना चित्रपटातून हात घालण्यात आल्याचं पाहायला मिळतं. सदाशिव राव भाऊ य़ांची व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता अर्जुन कपूर पहिल्यांदाज अशा रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर, अभिनेत्री क्रिती सेनन ही पार्वतीबाई ही व्यक्तीरेखा साकारताना दिसत आहे.
पद्मिनी कोल्हापूरे, मोनिष बहल, झिनत अमान असे चेहरेही या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहत असताना रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या कलाकारांच्या साथीने संजय लीला भन्साळी यांनी साकारलेला बाजीराव मस्तानी आणि पद्मावत हे चित्रपट आठवतात.
मुळात ऐतिहासिक घटनांमधील या सर्व व्यक्ती, त्यांचं कर्तृत्व हे सारंकाही मांडण्यामध्ये प्रेक्षकांना 'पानिपत'च्या दिग्दर्शकांकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ६ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे. पण, तूर्तास या ट्रेलरमध्ये गाजतोय तो म्हणजे अहमद शाह अब्दाली साकारणारा अभिनेता संजय दत्त.
आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित या चित्रपटात अब्दाली साकारण्यासाठी संजय दत्तची निवड करण्यात आल्यामुळे आता पानिपतमधील त्याची भूमिकासुद्धा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवत आहे. चित्रपटातील युद्धाचा भाग हा अतिशय रंजक असल्याचे संकेत ट्रेलरमधून मिळत आहेत. तर, पार्श्वसंगीताच्या बाबतीतही पानिपत उजवा ठरेल हे नाकारता येत नाही. तेव्हा आता विश्वासघाताच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित हा चित्रपटरुपी नजराणा कलाविश्वात अधिराज्य गाजवतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.