तापसी का म्हणतेय, `अक्सय कुमार मरवाएगा म्हारेको`
पडला ना प्रश्न....
मुंबई : खिलाडी कुमारसोबत 'बेबी' या चित्रपटात स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री तापसी पन्नू हिने आता त्याच्याचविषयी एक वक्तव्य करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 'अक्सय कुमार मरवाएगा म्हारेको', असं तापसी नेमकं म्हणतेय तरी का तेसुद्धा हरयाणवी शैलीत? पडला ना प्रश्न....
तापसीचं हे हरयाणवी रुप आणि तिचं वक्तव्य हे सारंकाही आहे 'सांड की आँख' या आगामी चित्रपटासाठी. नुकताच तिच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर दमदार लूकमध्ये दिसत आहेत. चंद्रो आणि प्रकाशी तोमर या वयोवृद्ध नेमबाज जोडीच्या जीवनप्रसंगांवर या चित्रपटाचं कथानक बेतलेलं आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यप, रिलायन्स एंटरटेंमेंट आणि निधी परमार यांनी केली आहे.
जगातील आणि भारतातील वयोवृद्ध नेमबाज जोडी म्हणून ख्याती प्राप्त असणाऱ्या दोन अफलातून आजीबाईंचा प्रवास आणि विविध स्पर्धांमध्ये त्यांची मिळवलेलं यश हा सारा प्रवास रुपेरी पडद्यावर उलगडण्यात येणार आहे.
'सांड की आँख' चित्रपटाच्या फर्स्ट लूकपासूनच त्याच्या कथानकाविषयी कुतूहल पाहायला मिळत होतं. त्यातच भूमी आणि तापसीचा एकंदर लूक पाहता, पारंपरिक हरयावी वेशात या दोघींचा अंदाजही तितकाच मनं जिंकणारा ठरला. त्यामुळे आता पुन्हा एकदा छोरियाँ किसीसे कम नही.... असं सिद्ध करणारा हा 'सांड की आँख' बॉक्स ऑफिसवर तगड्या कमाईचा नेम साधतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.