मुंबई :  विविध विषय तितक्याच शिताफीने हाताळत ते अतिशय प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडण्याकडे निर्माते आणि दिग्दर्शकांचा ओघ असतो. बॉलिवूडमध्ये अशा चित्रपटांचा प्रेक्षकवर्गही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. प्रयोगशीलतेची जोड देत असाच एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो चित्रपट म्हणजे 'सोनचिडिया'. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांत सिंह राजपूत, भूमी पेडणेकर, मनोज बाजपेयी, रणवीर शौरी आणि आशुतोष राणा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या 'सोनचिडिया' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या एकंदर आयुष्याभोवती या चित्रपटाचं कथानक फिरणार आहे. 


जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरमध्ये कलाकारांचा अभिनय, संवाद आणि छायांकन पाहता, रसिकांसाठी ही एक परवणीच असणार आहे. सुशांत सिंह राजपूत पासून, रणवीर शौरीपर्यंत प्रत्येकाचाच लूक अत्यंत लक्षवेधी ठरत असून, चित्रपटाचं कथानकही त्याप्रमाणेच दमदार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


'सोन चिडिया' म्हणजेच सोन्याच्या पक्षाच्या शोधात असणारे हे दरोडेखोर आणि त्यांचा वावर नेमका असतो तरी कसा याची झलक टीझरमधून पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे 'सोनचिडिया' हे प्रकरण आहे तरी काय, यावरुन मात्र पडदा उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 



अभिषेक चौबे दिग्दर्शित आणि रोनी स्क्रूवाला यांची निर्मिती असणारा हा चित्रपट पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 'डेढ इश्किया', 'उडता पंजाब' अशा चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या अभिषेक चौबे याने आता सोन चिडियाच्या निमित्ताने नेमका कोणत्या विषयाला हात घातला आहे, हे चित्रपटाच्या ट्रेलरमधून कळेलच.