मुंबई : स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर उपस्थित करण्यात आलेले असंख्य प्रश्न हे आजपर्यंत अनुत्तरितच होते. पण, या प्रश्नांची उकल आता ‘द ताश्कंद फाईल्स’ या चित्रपटातून होणार आहे. विवेक रंजन अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. जवळपास अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमुळे पुन्हा एकदा लाल बहादुर शास्त्री यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता, हा प्रश्न प्रकर्षाने पुढे येत आहे. या प्रश्नासोबतच त्याचं उत्तरही चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार असल्याची आशा प्रेक्षकांनी लावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भारताचे पंतप्रधान ताश्कंदला जातात काय, एका युद्ध करारावर स्वाक्षरी करतात काय आणि त्यांचा मृत्यू होतो काय.... घटनांची ही साखळी कितीही नैसर्गिक आहे असं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरीही त्यामुळे उदभवणारे प्रश्न हे काही केल्या कमी झालेले नाहीत. याचीच उकल करण्यासाठी बॉलिवूडमध्ये एका चित्रपटाच्या माध्यमातून काही पावलं उचलण्यात आली आहेत. ज्यामध्ये लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर संशयितांचा चौकशी का झाली नाही हा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित करण्यात आला आहे. देशातील राजकारणाची एक वेगळी आणि काहीशी विदारक बाजू चित्रपटातून पाहण्याची संधी मिळणार असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे.


११ जानेवारी, १९६६ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी ताश्कंदमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं होतं. किंबहुना चित्रपटातही हीच बाब प्राथमिक पातळीवर सांगण्यात येते पण, सत्य मात्र काही वेगळंच आहे हे ट्रेलर पाहताना लक्षात येतं. 'द ताश्कंद फाईल्स'मध्ये अभिनेत्री श्वेता बासू, पंकज त्रिपाठी, पल्लवी जोशी, मंदिरा बेदी, विनय पाठक, नसिरुद्दीन शाह आणि मिथुन चक्रवर्ती अशी स्टारकास्ट झळकणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट परवणीच ठरणार आहे.