मुंबई : Uri trailer video भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या संबंधांवर परिणाम करणाऱ्या एका महत्त्वाच्या घटनेला पुन्हा एकदा नव्या अंदाजात पाहता येणार आहे. ही घटना म्हणजे २९ सप्टेंबर २०१६ मध्ये झालेला सर्जिकल स्ट्राईक. लाईन ऑफ कंट्रोल अर्थात 'एलओसी'जवळ असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीर भागात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मसान', 'राजी' फेम अभिनेता विकी कौशल याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'उरी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. 'सादर करत आहोत, भारताला एक कणखर आणि ताकदवान देश म्हणून सर्वांसमोर आणणाऱ्या सैन्यदलाच्या इतिहासातील त्या प्रसंगावर भाष्य करणारा चित्रपट', अशाच स्पष्ट आणि तितक्याच थेट शब्दांमध्ये या ट्रेलरची सुरुवात होते. 


विकी कौशल, यामी गौतम, परेश रावल आणि इतर सहकलाकारांचा अभिनय पाहता बऱ्याच काळानंतर सैन्यदलाच्या एखाद्या मोहिमेवर भाष्य करणारी कलाकृती बॉलिवूडमध्ये साकारण्यात आल्याचं लक्षात येत आहे. 



आदित्य धर लिखित आणि दिग्दर्शित 'उरी'च्या ट्रेलरमधील दृश्य आणि संवाद हे अतिशय प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. या चित्रपटात विकी सैन्यदल अधिकारी विहान सिंग शेरगील यांची भूमिका साकारत आहे. आपल्या वाट्यावर त्याची पकड पाहता, प्रेक्षकांसाठी ही परवणीच असणार आहे.