कपूर कुटुंब `या` बाबतीत आधीपासूनच कडक; आलियाला कसं जमलं बुवा?
या कुटुंबाशी आतापर्यंत ज्यांचं नातं जोडलं गेलं आहे ती नावंही सातत्यानं प्रकाशझोतात आल्याचं आपण पाहिलं आहे.
मुंबई : कपूर कुटुंब हिंदी कलाजगतातील अतिशय लोकप्रिय कुटुंब म्हणून ओळखलं जातं. या कुटुंबाशी आतापर्यंत ज्यांचं नातं जोडलं गेलं आहे ती नावंही सातत्यानं प्रकाशझोतात आल्याचं आपण पाहिलं आहे. पण, या कुटुंबाची एक वेगळी बाजू तुम्ही पाहिलीये का?
कपूर कुटुंबात काही नियम आधीपासूनच सुरु होते. अशा नियमांमधील एक म्हणजे लग्न होऊन आलेल्या अभिनेत्रीनं किंवा कोणत्याही महिलेनं कुटुंबाला प्राधान्य देत तिथंच लक्ष केंद्रीत करावं. (Kapoor Family)
थोडक्यात काय, जर ती अभिनेत्री असेल तर तिनं रुपेरी पडद्यापासून दुरावा पत्करावा. असंच काहीसं घडलं अभिनेत्री मुमताज आणि अभिनेते शम्मी कपूर यांच्या नात्याच्या बाबतीत. (Shammi Kapoor mumtaz)
मुमताज आणि शम्मी यांची जोडी पडद्यावर सुपरहिट होतीच, पण प्रत्यक्ष आयुष्यातही या जोडीच्या नात्यात प्रेमाची चाहूल लागली होती. पण, पुढे हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.
शम्मी यांचं आपल्यावर अमाप प्रेम होतं, पण कपूर कुटुंब (काही बाबतीत) फारच कडक होतं, असं मुमताज यांनी स्पष्ट केलं. या साऱ्यामध्ये त्या लग्न करण्यासाठी आणि कुटुंबात रमत कारकिर्द सोडण्यासाठी तयार नव्हत्या.
'मी 17 वर्षांच्या वयात इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. त्यावेळी मी सर्वकाही सोडणं अतीघाईचं ठरलं असतं', असं त्या म्हणाल्या.
शम्मी यांना त्यांनी जेव्हा नकार दिला, तेव्हा तुला अभिनेत्री व्हायचंय म्हणून लग्न नकोय... तू कधीच माझ्यावर प्रेम नाही केलंस... अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मुमताज यांनी 1974 मध्ये व्यावसायिक मयुर माधवानी यांच्याशी लग्न केलं. ज्यानंतर त्यांनी कायमस्वरुपी चित्रपटांतून काढता पाय घेतला. तर, तिथे शम्मी यांनी फार आधीच अभिनेत्री गीता बाली यांच्याशी लग्न केलं होतं. पुढे गीता बाली यांच्या निधनानंतर त्यांनी 1969 मध्ये नीला देवी यांच्याशी सहजीवनाची नवी सुरुवात केली.
कपूर कुटुंबातील हा नियम आता मागे पडला आहे असं नाही. राहिला मुद्दा असा, की आलियानंही काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूरशी लग्न केलं. आता तीसुद्धा या नियमाचं पालन करणार, की चित्रपट जगतातील कारकिर्द सुरु ठेवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.