मुंबई :  हिंदी कलाविश्वात आणि एकदंरच सर्वत्र गेल्या काही दिवसांपासून लैंगिक शोषणाविरोधात अनेकांनीच आवाज उठवल्याचं पाहायला मिळत असून, सोशल मीडियावरही ही चळवळ सध्या बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहे. यातच आता संगीतकार- गायक अनू मलिकही अडचणीच आल्याचं पाहायला मिळत आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर मलिक यांना 'इंडियन आयडॉल'च्या परीक्षक पदावरून हटवण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गायिका श्वेता पंडीत आणि इतरही काही महिलांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 


आता गायिका कारालीसा मोंटेरियो हिनेही मलिक यांच्याविषयी एक गौप्यस्फोट केला आहे. 


जवळपास १५ वर्षांपूर्वीच्या 'त्या' प्रसंगाचा खुलासा कारालीसाने केला असून, तेव्हापासून आपण अनू मलिक यांच्यासोबत काम न केल्याचंही तिने स्पष्ट केलं. 


'नशे सी चढ गयी..', 'रंग रे' अशा गाण्यांसाठी ओळखली जाणारी कारालीसा त्या प्रसंगाविषयी म्हणाली, 'जॅमिंग सेशनसाठी अनू मलिक मला नेहमीच घरी येण्याचा आग्रह करत असत. पण, जर तुम्हाला माझ्याकडून गाणं गाऊन घ्यायचं असेल तर मी स्टुडिओमध्येच येईन. कारण मी एक व्यावसायिक कालकार आहे.'


ज्यावेळी कारालीसा अनू मलिक यांना भेटली तेव्हा तिचा गायक मित्र क्लिंटनही तिच्यासोबत होता. कारण त्यावेळीसुद्धा तिला एकटीने मलिक यांना भेटण्यास संकोचलेपणा वाटत होता.


अनू मलिक कसे आहेत हे सर्वांनाच माहितीये, असंही तिने स्पष्ट केलं. मुख्य म्हणजे तिच्या या सूचक वक्तव्यातून बऱ्याच गोष्टी उघड झाल्या असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 


कारालीसाने केलेला हा गौप्यस्फोट पाहता आता येत्या काळात मलिक यावर काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.