अफवा परसवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई; बॉलिवूड दिग्दर्शकाचा इशारा
...म्हणून त्याने उचललं हे पाऊल
मुंबई : बॉलिवूडमध्ये कलाकार सहसा विविध चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असतात. विविध ठिकाणी त्यांचे दौरे सुरुत असतात. अशा परिस्थितीत जेव्हा मोकळ्या वेळी मित्रपरिवारासोबत काही क्षण व्यतीत करण्याचा मुद्दा येतो तेव्हा या खास क्षणांना कोणाचाही नकार नसतो. बी- टाऊनमध्ये काही दिवसांपूर्वीच अशा एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याने या पार्टीचं आयोजन केलं होतं.
करणने आयोजित केलेल्या या पार्टीमध्ये दीपिरा पदुकोण, रणबीर कपूर, विकी कौशल, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, वरुण धवन, त्याची प्रेयसी नताशा दलाल आणि अशा इतरही काही सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. याच पार्टीतील एक व्हिडिओसुद्धा करणने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला.
आमदार मनजिंदर सिरसा यांनी करणच्या या व्हिडिओला पुन्हा पोस्ट करत त्यापुढे #UDTABollywood असा हॅशटॅग दिला. या पार्टीत सर्रास अंमली पदार्थांचा वापर केला गेल्याचा आरोपही त्यांनी केला. ज्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणीच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. ज्याविषयी आता खुद्द करण जोहरने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
राजीव मसंद यांच्याशी एका मुलाखतीदरम्यान करणने काही गोष्टी स्पष्ट केल्या. त्या पार्टीला कलाविश्वातील अतिशय यशस्वी अशा चेहऱ्यांची उपस्थिती होती. अशातच, काही चुकीच्या गोष्टी सुरु असतानाच व्हिडिओ पोस्ट करायला मला वेड लागलेलं नाही, अशा शब्दांत त्याने नाराजी व्यक्त केली. योगायोगाने घडलेल्या काही गोष्टींचा संदर्भ देत प्रकाशामुळे निर्माण झालेल्या सावलीला कशा प्रकारे एखादी पावडर असल्याचं म्हटलं गेलं, हेसुद्धा त्याने सांगितलं.
'अशा प्रकारच्या चर्चांवर आपण फारसे व्यक्त होत नाही, कारण मुळातच ते तथ्यहीन असतात. त्यामुळे पुढच्या वेळी अशा प्रकारच्या चर्चा पसरवण्याचा प्रयत्न करणयात आला तर मी त्यांच्याविरोधात कायदेशीर मार्गाचाच अवलंब करेन', असं तो म्हणाला. खोट्या मुद्द्याच्या बळावर तुम्ही कोणीही आमची प्रतिमा मलिन करु शकत नाही, हे अतिशय भयंकर आहे, या शब्दांत करणने अंमली पदार्थांचा संदर्भ देत त्याने आयोजित केलेल्या पार्टीवर टीका करणाऱ्यांना धारेवर धरलं.