मुंबई : कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगभरात पसरत आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लंडनमधून भारतात परतलेल्या बॉलिवूड सिंगर अनूप जलोटा यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. अनूप जलोटा यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६६ वर्षीय अनूप जलोटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचल्यानंतर ६० वर्षांवरील सर्व लोकांना विमानतळाजवळील मिराज हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या लक्षणांच्या परिक्षणासाठी सर्वांना वेगवेगळ्या रुममध्ये ठेवलं असून डॉक्टरांकडून सर्वांची तपासणी केली जात आहे. डॉक्टरांची टीम सर्वांची देखरेख करत असल्याचं त्यांनी सांगितलंय.


कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका वृद्ध आणि लहान मुलांना आहे. जलोटा यांनी मुंबई महापालिकेकडून त्यांची आणि विमानातून आलेल्या ६० वर्षांवरील सर्वांचीच योग्य ती, सर्व प्रकारची काळजी घेतली जात असल्याने आभार मानले आहेत. त्यांनी परदेशातून येणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.



अनूप जलोटा यांच्या ट्विटनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील जलोटा यांच्या ट्विटला धन्यवाद दिले आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाची सुरक्षित आणि योग्य काळजी घेईल जाईल तसंच आम्ही प्रत्येक नागरिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी अधिकाधिक खबरदारी घेत असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.