मुंबई : गायिका नेहा कक्कर आणि तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर, अभिनेता हिमांश कोहली यांच्या नात्यातील दुरावा आणखी वाढल्याचं लक्षात येत आहे. सध्या समोर आलेल्या वृत्तानुसार नेहाने हिमांशला तिच्यापासून दूर राहण्याची आणि तिच्या नावाचा वापर आपल्या प्रसिद्धीसाठी न करण्याची ताकिद दिली आहे. इतकच नव्हे, तर हा प्रकार न थांबवल्यास सगळं सत्य उघड करणार असल्याचा इशाराही तिने त्याला दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या नेहा आणि हिमांश यांच्या नात्याने एकेकाळी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. पण, पाहता पाहता हे नात्याचं समीकरण असंह काही वेगळ्या वळणावर आलं, ज्यामध्ये त्यांच्यात कमालीचा दुरावा आला. याचविषयी हिमांशने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टी उघड केल्या. 


ब्रेकअप झालं तेव्हा गोष्टी फार बिघडलेल्या नव्हत्या. पण, त्यानंतर मात्र गोष्टी बिघडत गेल्या असं म्हणत तो माझ्या जीवनातील एक अतिशय वाईट काळ असल्याचं त्याने सांगितलं. सध्या परिस्थिती सुधारली असली तरीही एक वेळ अशी होती, जेव्हा सारं जग मला अपशब्दांनी झोडपून काढत होती, अशी खंत त्याने व्यक्त केली. 


नेहासोबतच्या ब्रेकअपविषयी सांगताना तिची एक पोस्ट पाहूनच या नात्याविषयी लोकांनी अंदाज बांधल्याचं हिमांश म्हणाला. 'नेहा रिऍलिटी शोवर रडली आणि प्रत्येकानेच याचा दोष मला दिल्याचं सांगत त्यावेळी माझ्याही अश्रूंचा बांध फुटणार होता. पण, मी धैर्याची वाट निवडली', असं हिमांशने सांगितलं. 


हिमांशची ही मुलाखत समोर आली तेव्हा, नेहाने एका सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर निशाणा साधला. 'जे माझ्याविषयी वाईट विचार करतात त्यांची माझ्यासाठी काही किंमत नाही. ते खोटारडे आणि ईर्ष्या करणारे आहेत. ते फक्त माझ्या नावाचा वापर करत आहेत. यापूर्वीही करत होते. मी त्यांना इतकंच सांगू इच्छिते की स्वत:च्या कामाने नाव कमवा. माझ्या निमित्ताने नको', असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं. 



पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 


'मी तुझ्याबाबत आता काही बोलले तर आता थेट तुझ्या कुटुंबीयांचंही सत्य सर्वांसमोर आणेन. त्यांनी माझ्यासोबत जे काही केलं आहे ते सर्वांसमोर आणेन. माझ्या नावाचा वापर करण्याचं धाडसही करु नकोस. मला खलनायक सिद्ध करत स्वत: बिचारा असल्याचं भासवू नकोस', अशा थेट शब्दांत नेहाने तिची भूमिका स्पष्ट केली. खासगी जीवनात आलेल्या या वळणामुळे नेहानेही बऱ्याच अडचणींचा सामना केल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.