देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ

Feb 11, 2020, 16:00 PM IST
1/6

लग्नसोहळा म्हटलं की पाहुणेमंडळी, असंख्य विधी, खरेदी, एक वेगळाच थाट असं वातावरण डोळ्यांसमोर येतं. हल्ली तर, लग्नाच्या निमित्ताने एखाद्या नव्या ठिकाणाला भेट देत त्याच ठिकाणी एक सुरेख आणि अविस्मरणीय असा विवाहसोहळा आटोपण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. पण, या समजुतीला शह दिला आहे तो एका अभिनेत्याने. 

2/6

आपल्या साथीदारासोबत लग्नगाठ बांधत या अभिनेत्याने एक वेगळाच आदर्श समाजापुढे ठेवला आहे. कन्नड अभिनेता चेतन कुमार chetan kumar आणि त्याची आयुष्यभराची जोडीदार मेघा यांनी नुकतंच एकमेकांना साथ देण्याचं वचन देत लग्नगाठ बांधली. १ फेब्रुवारीला त्यांनी विवाहबंधनात अडकत त्याच्याच दुसऱ्या दिवशी बंगळुरू येथील विनोबा भावे आश्रमात एका स्वागत समारंभाचं आयोजन केलं होतं. या आश्रमाशी हे नवविवाहित दाम्पत्य गेल्या बऱ्याच दिवसांपासून जोडलं गेलं आहे. 

3/6

विशेष विवाह कायद्याअंतर्गत या जोडीचं लग्न पार पडलं. ज्यानंतर स्वागत सोहळ्यासाठी जवळपास ३ हजार पाहुण्यांनी उपस्थिती लावली. विवाहसोहळ्यामध्ये एकेमकांना वचनबद्ध करतेवेळी चेतन आणि मेघा यांना आशीर्वाद देण्यासाठी तृतीयपंथी समुदायातील कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती. द न्यूज मिनिटच्या वृत्तानुसार खुदद् चेतन त्याला मिळणाऱ्या शुभेच्छा पाहून भारावला. आपल्याला जीवनात अनेकजण विविध टप्प्यांवर भेटतात. पण, विवाहसोहळ्यासाठी मोठ्या संख्येने अनेकांची ही उपस्थिती पाहून आपण भारावल्याची प्रतिक्रिया चेतनने दिली. 

4/6

चेतन आणि मेघाच्या विवाहसोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य होतं. ते म्हणजे भारतीय संविधान. देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्नगाठ बांधली गेल्याचं आपण आजवर ऐकलं असेल. पण, या अभिनेत्याने चक्क भारतीय संविधानाच्या साक्षीने लग्नगाठ बांधली. लग्नात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आठवण भेट म्हणून त्यांनी संविधानाची एक प्रतही दिली. समाजात एकोपा रहावा आणि तो जपला जावा, यासाठी आणि लोकांनी संविधान वाचून त्यातील मुल्यांचं आचरण करण्याच्या दृष्टीने पावलं उचलावीत यासाठी आम्ही त्यांना ही खास भेट दिल्याचं चेतनने सांगितलं. 

5/6

चेतन आणि त्याची पत्नी मेघा हे दोघंही भेदभाव किंवा रुढी परंपरांच्या बंधनात अडकलेले नाहीत. उलटपक्षी त्यांना संविधानात आखून दिलेल्याच मार्गाने विवाहबद्ध व्हायचं होतं. त्यामुळेच त्यांनी विशेष विवाह कायद्याअंतर्गत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या नव्या नात्याची सुरुवात समाज, वैयक्तिक आयुष्य आणि निसर्ग अशा तीन महत्त्वाच्या घटकांची शपथ घेत केली. 

6/6

मंत्रोच्चारण, विधी, परंपरा, रुढी, मान या साऱ्यांच्या आधारे होणारे असंख्य विवाहसोहळे आपण पाहिले असतील. पण, आपलं सामाजिक भान जपत फक्त दिखाव्यापुरताच काही मुल्यांचा स्वीकार न करता अंतर्मनातूनही त्यांचा स्वीकार करत त्याच मार्गावर चालत नव्या आणि तेजस्वी वाटांवर चेतन- मेघाचा हा प्रवास सुरु झाला आहे. ज्यासाठी त्यांना संपूर्ण कलाविश्व, चाहते आणि विविध सामाजिक स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत. (सर्व छायाचित्रे - इन्स्टाग्राम)