पाकिस्तानात जन्मण्याच्या `त्या` वक्तव्यावर सोनूची सारवासारव
माध्यमांवर साधला निशाणा
मुंबई : एकेकाळी गायनशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा आणि प्रकाशझोतात असणाररा गायक सोनू निगम सध्याच्या त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
नुकतंच एका कार्यक्रमात भारतीय गायकांच्या सद्यस्थितीवषयी आपलं मत मांडताना त्याने ही प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानात जन्मलो असतो तर गायन क्षेत्रात जास्त संधी मिळाल्या असत्या असं तो म्हणाला.
'हल्ली गायकांना विविध कार्यक्रमामध्ये, कॉन्सर्टमध्ये आपली कला सादर करण्यासाठीच म्युझिक कंपनीला पैसे द्यावे लागतात. जर पैसे दिले नाहीत तर इतर गायकांना कंपनीकडून संधी दिली जाते आणि त्या गायकांना प्रसिद्धी मिळते', म्युझिक कंपनीच्या याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सोनूने पाकिस्तानी कलाकारांकडून, गायकांकडून मात्र पैसे आकारले जात नसल्याचं स्पष्ट केलं. आतिफ अस्लम आणि राहत फतेह अली खान यांची नाव घेत सोनूने त्याचं उदाहरण दिलं.
आपल्या या वक्तव्यातून फक्त 'पाकिस्तानात जन्मलो असतो तर...', ही एकच ओळच माध्यमांनी उचटून धरली आणि लक्षवेधी मथळा तयार करण्याच्या उद्देशाने आपलं म्हणणं चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा आरोप त्याने माध्यमांवर केला. एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सोनूने आपली प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. सोनूच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनीच त्याच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली.
आपल्या वक्तव्यातून नेमकं काय म्हणायचं होतं हे अधोरेखित करत त्याने हा सर्व प्रकार घृणास्पद असल्याचं म्हटलं. सोनूने दिलेलं हे स्पष्टीकरण पाहता आता नेटकऱ्यांमध्ये याचीही चर्चा होणार का आणि झालीच तर, त्यातून कोणत्या नव्या विषयांना वाव मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.