मुंबई : हिंदी कलाविश्वात आपल्या अफलातून नृत्यकौशल्यानं अनेकांना भुरळ पाडणाऱ्या आणि कैक सेलिब्रिटींना खऱ्या अर्थानं आपल्या तालावर नाचवणाऱ्या ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका saroj khan सरोज खान यांना रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त समोर येत आहे. शनिवारपासूनच त्यांना मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या गुरुनानक रुग्णालयात दाखल केल्याचं म्हटलं जात आहे. श्वसनाच्या त्रासामुळं त्यांनी रुग्णालय गाठल्याची माहिती मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खान याच्या एका जवळच्या नातेवाईकांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. 'आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. श्वास घेण्यात काही अडचणी येत असल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सरोज खान यांना होणारा त्रास पाहता त्यांनी कोरोना टेस्टही करण्यात आली. पण, ही टेस्ट निगेटीव्ह आली आहे. शिवाय त्यांना कोणच्याही प्रकारची कोरोनाची लक्षणही आढळलेली नाहीत', असं नातेवाईकांकडून सांगण्यात आलं. शिवाय लवकरच त्यांना रुग्णालयातून घरीसुद्धा पाठवण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं. 


मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यातही वयोवृद्धांना याचा असणारा धोका पाहता खान यांच्या बाबतीतही सावधगिरीचं पाऊल उचलण्यात आलं होतं. पण, त्यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्यामुळं एक दिलासाच मिळाला आहे. 


 


गेल्या कित्येक दशकांपासून कलाविश्वात आपल्या नृत्यदिग्दर्शनाच्या बळावर वेगळी छाप सोडणाऱ्या सरोज खान यांनी कायमच सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 'हवा हवाई', 'एक दो तीन', 'धक धक' अशा गीतांसाठी नृत्यदिग्दर्शन करणाऱ्या खान यांची चाहत्यांवर आजही तितकीच छाप आहे जितकी काही दशकांपूर्वी होती.