बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र लिहिलं आहे. अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारल्याबद्दल नरेंद्र मोदींचे आभार मानण्यासाठी तिने हे पत्र लिहिलं आहे. तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात अशा शब्दांत कौतुक केलं आहे. भाजपाने एक्स अकाऊंटवर शिल्पा शेट्टीने लिहिलेलं हे पत्र शेअर केलं आहे. 5 शतकांपासून श्रीरामांना वनवास घडत होता. अखेर तो वनवास संपला. तेही मोदीजींच्या प्रयत्नांमुळे असं भाजपाने म्हटलं आहे. 


शिल्पा शेट्टीने पत्रात काय लिहिलं आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पत्राच्या विषयात शिल्पा शेट्टीने अयोध्येत राम मंदिर उभारण्याचं करोडो लोकांचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल कौतुक आणि अभिनंदन असं लिहिलं आहे. पत्रात तिने लिहिलं आहे की, "काही लोक इतिहास वाचतात, काही लोक इतिहास शिकतात. पण तुमच्यासारखे लोक इतिहास बदलतात. तुम्ही राम जन्मभूमीचा 500 वर्षांचा इतिहास बदलून दाखवला. तुमचे मनापासून आभार". 


भाजपाने शेअर केलं पत्र


भाजपा महाराष्ट्रने एक्सवर हे पत्र शेअर केलं आहे. "सुप्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी  नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पत्र लिहून त्यांचे आभार मानले. 5 शतकांपासून श्रीरामांना वनवास घडत होता. अखेर तो वनवास संपला. तेही मोदीजींच्या प्रयत्नांमुळे.. यासाठीच शिल्पाजींनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत," असं भाजपाने म्हटलं आहे.



तुम्हीही पंतप्रधानांचे आभार मानणारे पत्र namo@bjpcc.org या ईमेल आयडीवर मेल करा, काही निवडक पत्रांना आम्ही मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिध्दी देऊ असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं आहे. 


22 जानेवारीला अयोध्या राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याला मनोरंजन क्षेत्रापासून ते उद्योग जगतापर्यंत अनेक दिग्गज उपस्थित होते. नरेंद्र मोदींनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना हा फक्त अभिमानाचा नाही तर भावूक क्षण आहे असं म्हटलं होतं. 


हा आपल्यासाठी फक्त सेलिब्रेशनचा मुद्दा नाही तर आगामी समाजाचं चित्र आहे असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले होते. हे मंदिर वाद निर्माण करेल अशी भीती अनेकांना वाटली होती. पण आज हेच मंदिर शांतता, एकात्मता यांचं प्रतिक ठरत आहे असं ते म्हणाले होते. "एकवेळ अशी होती जेव्हा लोक राम मंदिर झालं तर आग लागेल असं म्हणत होते. पण या लोकांना आपल्या समाजाची पवित्रता एकत्र ठेवत असल्याची जाणीव नाही. या मंदिरामुळे फक्त सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे," असं नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं.