बॉक्स ऑफिसवर `आर्टिकल १५`चा दमदार प्रभाव, कमाईचे आकडे पोहोचले...
चित्रपटाची कथा २०१४ मध्ये उत्तर प्रदेशच्या बदायूं येथे झालेल्या सामूहिक बलात्कारावर आधारलेली आहे.
मुंबई : 'इन्साफ की भीक मत मांगो, बहुत माँग चुके...' फक्त तीन रूपयांसाठी दोन बहिणींचा सामुहिक बलात्कार करण्यात येतो. विविध जातींच्या पेचात अडकलेले लोक. अशा इत्यादी गोष्टींभोवती 'आर्टिकल १५' चित्रपटाची कथा फिरत आहे. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी ३ कोटींचा गल्ला जमा केला, तर धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर होणारा भेदभाव 'आर्टिकल-१५' या चित्रपटात टीपण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी केला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने ४० कोटींचा आकडा पार केला आहे.
ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहेत. १८ कोटींच्या बजेटमध्ये चित्रपट साकारण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेता आयुषमान खुराना पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकत आहे. चित्रपटातील त्याच्या भूमिकेला चाहत्यांकडून त्याचप्रमाणे समीक्षकांकडून उत्तम दाद मिळत आहे.
चित्रपटाची कथा २०१४ मध्ये उत्तर प्रदेशच्या बदायूं येथे झालेल्या सामूहिक बलात्कारावर आधारलेली आहे. या घटनेनंतर देशात एकच खळबळ उडाली होती. 'आर्टिकल-१५' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारलेला आहे. २१व्या शतकात सुद्धा जनता जात, पात, लिंग, वंश इत्यादींच्या जाळ्यात अकलेली आहे हे दाहक वास्तव चित्रपटातून मांडण्यात आलं आहे.