`बॉईज 4` मधील टायटल सॉन्गमध्ये Robotics डान्स फॉर्म! प्रेक्षकांच्या वळल्या नजरा
Boys 4 Song : `बॉईज 4` चित्रपटातील टायटल सॉन्ग प्रदर्शित... रोबोटिक्स डान्स फॉर्मनं वेधलं प्रेक्षकांचं लक्ष. एकदा व्हिडीओ पाहाच
Boys 4 Song : 'बॉईज'च्या सर्व भागांना अवघ्या महाराष्ट्रातून प्रेम मिळाले. धैर्या, ढुंग्या आणि कबीर अनेकांना आपल्यातलेच एक वाटले. आता हे त्रिकुट चौपट धमाल घेऊन 'बॉईज ४'मधून आपल्या भेटीला येत आहेत. नुकतेच या चित्रपटातील 'टायटल सॉन्ग' एका कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आले. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे रॅप सॉन्ग अवधूत गुप्ते यांच्यासह प्रतीक लाड, सुमंत शिंदे आणि पार्थ भालेराव यांनी गायले आहे. त्यामुळे या गाण्याच्या निमित्ताने आता हे त्रिकुट गायकही बनले आहे. अवधूत गुप्ते यांचे जबरदस्त संगीत लाभलेल्या या गाण्याला हृषिकेश कोळी यांनी शब्दबद्ध केले आहे. यापूर्वीही बॉईजच्या प्रत्येक भागातील गाण्यांनी संगीतप्रेमींना वेड लावले. आता हे टायटल सॉन्गही तरुणाईला भुरळ घालणारे असेल. धैर्या, ढुंग्या आणि कबीर या गाण्यातही धमाल करताना दिसत आहेत. या गाण्यातून त्यांचा स्वॅगही दिसत आहे. त्यामुळे आता लवकरच 'बॉईज 4' ची ही नवीन हूक स्टेपही तरुणाईत प्रचलित होईल, हे नक्की!
या गाण्याबाद्दल संगीतकार, गायक अवधूत गुप्ते म्हणतात, 'बॉईजच्या आधीच्या गाण्यांना मिळणारा प्रतिसाद पाहाता, हे गाणेही तितकेच वजनदार असावे, असे आम्हाला वाटत होते. तीन भागांना मिळालेले प्रेम पाहाता चौथ्यासाठी आमची जबाबदारी अधिक वाढली होती. यात काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने यावेळी आम्ही सुमंत, पार्थ आणि प्रतीकला गाण्याची संधी दिली आणि या संधीचे त्यांनी खरंच सोने केले. अतिशय उत्तमरित्या त्यांनी हे गाणे गायले. मलाही त्यांच्यासोबत गाताना मजा आली. मी हे गाणे खूप एन्जॉय केले. मला खात्री आहे प्रेक्षकही ही हे टायटल सॉंग एन्जॉय करतील. हे गाणे ऐकायला जितके भन्नाट वाटतेय तितकेच त्याचे सादरीकरणही एकदम कडक आहे.'
हेही वाचा : Tiger 3 Teaser : टायगरची झोया कुठंय? Tiger 3 च्या टीझरमध्ये कतरीना कैफबद्दल मोठी अपडेट!
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे. 20 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.