मुंबई : 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते या चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. मात्र, ट्रेलरबाबत रणबीरला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, ट्रेलरमध्ये रणबीर कपूरला एका सीनसाठी ट्रोल करण्यात आलं होतं ज्यामध्ये अभिनेता मंदिराच्या आत शूज परिधान करतो. अलीकडेच, चित्रपटाच्या दिग्दर्शक अयान मुखर्जीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर स्पष्ट केलं की, रणबीरने मंदिराच्या सीनमध्ये बूट का घातले होते. यासोबतच त्याने चाहत्यांना असंही सांगितलं की आता ट्रेलर 4K मध्ये देखील रिलीज झाला आहे.


अयान मुखर्जीकडून सफाई
अयान मुखर्जीने लिहिलं की, 'आमच्या ट्रेलरमध्ये एका सीनमुळे काही लोकं नाराज झाले होते. रणबीरच्या पात्राने शूज घातले आहेत. या चित्रपटाचा निर्माता या नात्याने मी सांगू इच्छितो की, आमच्या चित्रपटात रणबीर मंदिरात प्रवेश करत नसून दुर्गा पूजा मंडपात प्रवेश करत आहे. माझं स्वतःचं कुटुंब ७५ वर्षांपासून अशाच दुर्गापूजेचे आयोजन करत आहे. मी लहानपणापासून त्याचा एक भाग आहे. माझ्या अनुभवानुसार, आम्ही देवीच्या स्टेजवर जाण्यापूर्वीच बूट काढतो, तुम्ही मंडपामध्ये गेल्यावर नाही.'


अयान पुढे म्हणाला, 'प्रत्येक माणसापर्यंत हे पोहोचणं माझ्यासाठी खास आहे, कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मास्त्र ही भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचा आदर करताना साजरी करणारी भावना आहे. त्यामुळेच मी हा चित्रपट बनवला आहे. म्हणूनच ब्रह्मास्त्र पाहणाऱ्या प्रत्येक भारतीयापर्यंत ही भावना पोहोचणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.



रणबीर कपूर आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त 'ब्रह्मास्त्र'मध्ये नागार्जुन, मौनी रॉय आणि अमिताभ बच्चन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.