Burglary at Pushkar Shotri : नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालन अशा विविध माध्यमांमधून घराघरांत पोहोचलेले पुष्कर श्रोत्री यांच्या घरात चोरी झाली आहे. त्यांच्या घरात केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेनंच त्यांच्या घरी लाखो रुपयांची चोरी केली आहे. इतकंच नाही तर त्या ठिकाणी तसेच हुबेहुब दिसणारे खोटे दागिने ठेवले. हे कळताच पुष्कर श्रोत्रीनं पोलिसात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुष्कर यांनी विलेपार्ले पोलिसात तक्रार केली होती. ती तक्रार करत असताना त्यांनी पोलिसांना माहिती दिली की, घरकाम आणि त्यासोबत त्यांचे वडील सुधाकर यांची काळजी घेण्यासाठी त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून केअर टेकर म्हणून उषा हिला कामावर ठेवले होते. तिच्याशिवाय अहिल्या आणि अक्षता या दोघी देखील दोन शिफ्टमध्ये काम करतात. पुष्कर यांनी सांगितले की 15 ऑगस्ट रोजी वडिलांना 1 लाख 20 हजार रुपये दिले होते. त्यानंतर दोन दिवसात म्हणजे 17 ऑगस्ट रोजी कामानिमित्तानं ते अमेरिकेला गेले आणि त्यानंतर ते 20 सप्टेंबर रोजी परत आले. 


हेही वाचा : अंकितासमोर सलमाननं केला तिच्या पतीविषयी धक्कादायक खुलासा, सत्य कळताच तिला रडू कोसळलं आणि...


अमेरिकेवरून आल्यानंतर पुष्कर यांनी त्यांच्या वडिलांच्या कपाटत पाहिले तर त्यांना दिलेले पैसे त्यात नव्हते. इतकंच नाही तर त्यांच्या बेडरूममध्ये असलेलं त्यांचं पाकीट देखील तिथे नव्हते. त्या पाकीटात वेगवेगळ्या देशातील चलन होतं. हे सगळं पाहताच त्यांच्या लक्षात आलं की घरात चोरी झाली आहे. पुष्कर यांना सगळ्यात आधी उषावर संशय आला आणि त्यांनी तिची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या चौकशीत असे समोर आले की उषानं तिचा पती भानुदाससोबत मिळून ही चोरी केली.  त्यानंतर त्यांनी भानुदासला ताब्यात घेतले आणि तेव्हा कळलं की विदेश चलन भारतीय रुपयांमध्ये बदलून घेतले, त्या बदल्यात 60 हजार रुपये त्यांना मिळाले. त्याशिवाय त्यांनी पुष्कर यांची पत्नी प्रांजलचे दागिने चोरले आणि त्यासारखे हुबेहुब दिसणारे खोटे दागिने तिथे ठेवले. त्या दागिन्यांमध्ये तिला गोफ, बांगड्या, वळे यांचे हुबेहुब दागिने मिळू शकले नाही त्यामुळे तिनं ते तसेच ठेवले, जेणेकरून कोणाला संशय येणार नाही आणि बाकी सगळे दागिने तिनं चोरी केले. 


दागिन्यांच्या चोरीचं कसं कळल? 


दसऱ्याच्या निमित्तानं प्रांजलनं यांनी कपाटात दागिने घालण्यासाठी काढले तेव्हा त्यात काहीतरी वेगळं असल्याचं त्यांना वाटलं. त्यानंतर त्यांनी पुष्कर यांना हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पुष्कर आणि प्रांजल हे दोघं त्यांचे हे दागिने ज्या सोनाराकडून घेतले त्या सोनाराकडे त्यांनी तपासण्यासाठी नेले तर तेव्हा कळलं की ते दागिने खोटे आहेत. तर उषा आणि तिच्या पतीनं थोडक्यात एकूण 10 लाख 27 हजार 408 रुपयांची चोरी केल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिस या प्रकरणात आणखी तपास करत आहेत.