`महिनाभर छत्रपती शिवाजी महाराजांवरील वर्कशॉप घ्या, कारण...`; दिग्पाल लांजेकरांचा मंत्रिमंडळाला सल्ला
‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, तृप्ती तोरडमल, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र आणि मृणाल कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
Digpal Lanjekar On Chhatrapati Shivaji Maharaj : दिग्पाल लांजेकर यांनी अभिनय, दिग्दर्शन, लेखन यामधून मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी छाप उमटवली आहे. दिग्पाल लांजेकर हे ‘श्री शिवराज अष्टक’ माध्यमातून प्रसिद्धीझोतात आले. याद्वारे आतापर्यंत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, सुभेदार हे चार ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता दिग्पाल लांजेकरांचा 'शिवरायांचा छावा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी त्यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.
दिग्पाल लांजेकर हे सध्या 'शिवरायांचा छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यानिमित्ताने त्यांनी मराठी मनोरंजन विश्व या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी त्यांना राजकीय नेत्यांबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी फारच स्पष्टपणे भाष्य केले. राजकीय नेत्यांनी किंवा मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी किमान महिनाभर छत्रपती शिवाजी महाराजांची राज्य कारभार करण्याची पद्धत समजून घ्यायला हवी, असे दिग्पाल लांजेकर म्हणाले.
"माझ्या सुदैवाने माझे काही चित्रपट हिट झाले. त्यानिमित्ताने माझा अनेक कार्यक्रमांमुळे राजकीय नेत्यांशी संपर्क येतो. जे राजकीय मित्र आहे, ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांना मी एक सुचवलं आहे. कोणत्याही पक्षाचं मंत्रिमंडळ असू द्या, त्यांनी किमान 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर सर्व मंत्र्यांचा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरील वर्कशॉप घ्यावा. ज्यामुळे त्यांची जी राज्य कारभार करण्याची पद्धत आहे, ती सर्व आपल्याला समजेल. कृषी व्यवस्थेचे उदाहरण घेऊया. छत्रपती शिवरायांच्या काळात महाराष्ट्रात तीन वेळा मोठा दुष्काळ पडला होता. पण त्या काळात कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे दिसत नाही. याचा कुठेही उल्लेखही नाही. हे असं का, तर त्यांनी काही विशिष्ट धोरणं आखली होती, असे दिग्पाल लांजेकरांनी सांगितले.
यापुढे ते म्हणाले, रामचंद्र पंत यांची काही आज्ञापत्र आढळतात, ती वाचल्यानंतर आपल्याला कळतं की छत्रपती शिवाजी महाराज हे फार धोरणी राजा होते. पाणीविषयक, जंगलविषयक, कृषीविषयक, आरमाराबद्दलचे, व्यापाराबद्दलचे कायदे होते. त्यामुळे या सर्व गोष्टीचा अभ्यास करायला हवा, असं मला वाटते. सर्व कायदे, नितीनियम ज्या गोष्टी त्यांनी सैन्याला घालून दिल्या होत्या, त्या सर्व गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांनी नेटाने पुढे चालवल्या. त्यामुळे नऊ वर्षात स्वराज्य दीडपटीने वाढलं. या सर्व गोष्टींचा अभ्यास आणि वाचन आपल्या राज्यकर्त्यांचं असायला हवं", असं मला वाटतं.
दरम्यान ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट येत्या 16 फेब्रुवारी 2024 ला प्रदर्शित झाला. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, तृप्ती तोरडमल, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र आणि मृणाल कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत.