हरवली पाखरे… अनेकांचं बालपण रंजक करणारं Cartoon Network करणार अलविदा
वॉर्नर ब्रोज एनिमेशन आणि कार्टून नेटवर्क यांच्या विलिनीकरणाची घोषणा
RIP Cartoon Network : गेल्या अनेक पिढ्यांचं कार्टून नेटवर्क चॅनलशी नातं जुळलं आहे. 2002 च्या काळात टॉम अँड जेरी (tom and jerry), स्कूबी डू (scooby doo), पावरपफ गर्ल्स (The Powerpuff Girls), जॉनी ब्रावो (johnny bravo) सारख्या कार्टून मालिकांनी अनेकांचं बालपण अधिक रंजक केलं. शाळा सुटली रे सुटली की लहान मुलं घरी आल्यावर टीव्हीसमोर बसून कार्टून नेटवर्क चॅनेलवर (Cartoon Network) आपल्या आवडत्या कार्टून मालिका बघायची. टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज भरमसाठ कार्टून मालिका आहेत. पण आजही कार्टून नेटवर्कच्या तुमच्या आमच्या काळातील त्या कार्टून मालिकांची मजाच काही वेगळी होती. कार्टून नेटवर्कवरची एकतरी कार्टून मालिका (Cartoon Serial) पाहिली नाही असा व्यक्ती त्यावेळी भेटणं कठिणच. प्रत्येकाचं भावविश्व कार्टून नेटवर्कने समृद्ध केलं आहे.
कार्टून नेटवर्कचा अलविदा
कार्टून नेटवर्कशी संबंधीत मोठी बातमी समोर आली आहे. वॉर्नर ब्रोज एनिमेशन आणि कार्टून नेटवर्क यांच्या विलिनीकरण (Cartoon Network Merger With Warner Bros) होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे कार्टून नेटवर्क संकटात सापडलं आहे. इतकंच नाही तर कार्टून नेटवर्कमधील अनेक कर्मचाऱ्यांना काढण्यात आल्याचं वृत्त आहे. चॅनेल बंद होणार याबाबत अद्याप कोणतीह अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण ही बातमी समोर येताच कार्टून नेटवर्कचे चाहते दु:खी झाले आहेत.
चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू
वॉर्नर ब्रोज टेलिव्हिजिन ग्रूपने मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली होती. विलिनीकरणानंतर कार्टून नेटवर्कमधले 26 टक्के कर्मचारी कमी करत असल्याची घोषणा त्यांनी केली होती. यात स्क्रिप्टेड, अनस्क्रिप्टेड आणि अॅनिमेशन विभागतील 126 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. या बातमीनंतर सोशल मीडियावर लाखो चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलंय. कार्टून नेटवर्कवरच्या आपल्या आवडत्या कार्टून मालिका आणि त्यातल्या पात्रांच्या आठवणीने चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळलेत. ट्विटरवर #RIPCartoonNetwork हा हॅशटॅग वेगाने ट्रेंड होतोय.
लहानपणीचे ते रंजक दिवस
कार्टून नेटवर्कने तुमचं आमचं बालपण रंजक आणि सुखद केलंय. त्यातल्या पात्रांनी आपल्याला हसणं शिकवलं. कार्टून नेटवर्कच्या अनेक कार्टून मालिका आजही प्रत्येकाच्या लक्षात आहेत. सामुराई जॅक, करिज द कॉवर्डली डॉग, डेक्स्टर लैबॉरेट्री, एड एड एंड एडी, टीन टाइटन्स, बेन 10 या मालिकेतील पात्र आपल्या प्रत्येकाच्या बालपणातला एक हिस्सा आहेत.