मुंबई : बॉलिवूड अभिनेता नसिरुद्दीन शाह यांची मुलगी हीबा शाहवर पशुवैद्यकीय रुग्णालयाकडून (Veterinary Hospital) गंभीर आरोप लावण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ जानेवारीला पशुवैद्यकीय रुग्णालयातील दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप हीबावर लावण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. या कॅमेरातील फुटेज मुंबई पोलिसांकडे पाठवण्यात आलं आहे. जनावरांवर उपचार करणाऱ्या Feline foundation रुग्णालयाकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी हीबा शाहविरोधात अदखलपत्र गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.


काय आहे प्रकरण -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्सोवा येथे राहणारी हीबा शाहची मैत्रिण सुप्रिया शर्मा ही १६ जानेवारीला तिच्या दोन मांजरींच्या नसबंदीसाठी त्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयात घेऊन जाणार होती. पण काही कारणास्तव ती जाऊ शकली नाही. आणि त्याऐवजी नसिरुद्दीन शाह यांची मुलगी हीबा त्या मांजरींना घेऊन दुपारी अडीचच्या सुमारास रुग्णालयात पोहचली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एक सर्जरी सुरु असल्याने हीबाला ५ मिनिटं थांबण्यास सांगितलं. पण काही मिनिटांनी हीबा त्याच कर्मचाऱ्यांना रागावून, आरडाओरड करत धमकावू लागल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.


मांजरींना ऍडमिट करण्यापूर्वी, हीबाला काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी सांगितलं. स्वाक्षरी करण्यासाठी सांगितल्यावर हीबा भडकली, तिने कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याच सांगण्यात आलंय. यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी हीबाला रुग्णालयातून जाण्यास सांगितलं. यावरुन तिने २ महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. 


पोलिसांनी हीबाविरोधात भारतीय दंड संविधान ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे. हीबा शाह नसीरुद्दीन शाह यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे.