कंगना- स्वरामध्ये वादाची ठिणगी; आरोप प्रत्यारोपांचा भडका
वादास कारण की....
मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत ही गेल्या काही वर्षांपासून तिच्या चित्रपटातील भूमिकांपेक्षा काही वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत आहे. कंगना आणि तिच्याभोवती असणारं वादाचं वलय ही काही नवी बाब नाही. त्यातच आता भर पडली आहे ती म्हणजे आणखी एका विषयाची.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनानं पॅरेलल सिनेमा या मुद्द्याला हात घातला होता. किंबहुना या संकल्पनेची सुरुवात कलाविश्वात आपण केल्याचा दावाच तिनं केला होता. ज्यावर अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं तिची प्रतिक्रिया देत बी टाऊनच्या या क्वीनवर निशाणा साधला.
स्वरानं ट्विट करत लिहिलं, ''१९५५ मध्ये 'पाथेर पांचाली' या चित्रपटासोबतच कंगना यांनी पॅरेलल सिनेमाची सुरुवात केली. २०१३ मध्ये त्यांनी 'क्वीन' पासून स्त्रीवादाची सुरुवात केली. पण, या साऱ्याच्याही आधी त्यांनी १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं''.
इतक्यावरच न तांबता स्वरानं, कहत एक अज्ञात चापलूस ज़रूरतमंद आउट्साइडर, चापलूसी का फल (आम) खाते और उँगलियाँ चाटते हुए। अशी ओळ लिहित कंगनावर टीका केली.
तिचं हे ट्विट पाहून आगपाखड करत कंगनानंही सोशल मीडियाच्याच माध्यमातून स्वरावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. 'प्रिय स्वरा, तुमच्यापैकी कोणीही भारतीय चित्रपटात्या सुवर्णयुगात जन्मालाही आलं नव्हतं. गँगस्टर, माफिया आणि डान्सचे उद्योग सांभाळल्यानंर हा एक घाणेरडा नालाच झाला होता. स्त्रीवाद आणि पॅरेलल सिनेमाची सुरुवात 'क्वीन' पासूनच सुरु झाली होती. जर असं झालंच नव्हतं, तर मग जरा सांग हे सारं केव्हा झालं होतं', असं लिहित कंगनानंही स्वराला प्रत्युत्तर दिलं. सोशल मीडियावर या दोन्ही अभिनेत्रींमध्ये झालेली ही शाब्दिक बाचाबाची आणि आरोप प्रत्यारोपांचं सत्र पाहून आता आणखी एका वादानं डोकं वर काढलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.