`मणिकर्णिका` नंतर आता `या` सिनेमाने बदलली प्रदर्शनाची तारीख
`ठाकरे` सिनेमासाठी घेतला हा निर्णय
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या दिवशी दुसरा कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही अशी शिवसेनेच्या नेत्यांची भूमिका होती. या भूमिकेला पाठिंबा देत अनेक सिनेमा मेकर्सने आपल्या सिनेमांची रिलीज डेट बदलली आहे.
कंगना रानावतचा बहुचर्चित सिनेमा 'मणिकर्णिका'च्या मेकर्सने आपल्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. तसेच आता आणखी एका सिनेमाने आपल्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
इमरान हाशमीच्या 'चीट इंडिया' या सिनेमाच्या संपूर्ण टीमने हा निर्णय घेतला आहे. 25 जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण आता अशी माहिती मिळते की, हा सिनेमा एक आठवडा अगोदर प्रदर्शित होणार आहे.
शिवसेनेच्या सांगण्यावरून नवाजु्द्दीन सिद्दीकी स्टारर 'ठाकरे' या सिनमाला मोकळा रस्ता मिळावा याकरता 'चीट इंडिया'ने हा निर्णय घेतला आहे. शिवसेनेची इच्छा आहे की, बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित 'ठाकरे' हा बायोपिक सोलो प्रदर्शित व्हावा.
'चीट इंडिया' सिनेमाच्या प्रोड्युसरने एवढ्या मोठ्या सिनेमासोबत सामना करण्यापासून वाचण्यासाठी मार्ग शोधला आहे. त्यांनी एक आठवडा अगोदरच म्हणजे 18 जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर, इमरान हाशमी या सिनेमात राकेश सिंह या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. जो परिक्षांमध्ये काळाबाजार करतो. श्रीमंत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पास करण्यासाठी हुशार विद्यार्थी परिक्षेला बसवतो.
भारतातील शैक्षणिक व्यवस्थेवर भाष्य करणारा हा सिनेमा असून शिक्षण व्यवस्था किती भ्रष्ट बनली आहे हे दाखवण्यात आलं आहे. या सिनेमात इमरानसोबत श्रेया धनवंतरी असून दिग्दर्शक सौमिक सेन यांनी केलं आहे.