#Chhapaak : लक्ष्मी-अलोकची लव्हस्टोरी
#NokJhok गाण्याचा खास व्हिडिओ
मुंबई : मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि 'नोक झोक' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. यानंतर आता मेघना गुलजार यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये लक्ष्मी अग्रवाल आणि अलोक दीक्षित यांच्या सुंदर प्रेमळ क्षणांचा उल्लेख केला आहे.
'छपाक' सिनेमात लक्ष्मीची भूमिका दीपिका पदुकोण आणि अलोकची भूमिका विक्रांत मेस्सी साकारत आहे. या सिनेमातील 'नोक-झोक' हे गाणं लक्ष्मी आणि अलोक यांच्या जीवनावर आधारित आहे. या गाण्यातून दोघांचं सुंदर प्रेम समोर येत आहे. य गाण्याचा आणखी एक व्हिडिओ मेघना गुलजार यांनी आज शेअर केला आहे.
लक्ष्मी-अलोक यांची लव्हस्टोरी
15 वर्षांच्या लक्ष्मीला 32 वर्षाच्या मैत्रिणीच्या भावाने लग्नाची मागणी घातली होती. लग्नाला विरोध केल्यामुळे त्याने तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं. यानंतर एका कार्यक्रमात तिला विचारण्यात आलं की,'ज्या व्यक्तीने तुझ्यावर ऍसिड फेकलं त्याने तुला लग्नाची मागणी घातली तर.' त्यावर लक्ष्मीने उत्तर दिलं की,'त्याने माझा चेहरा बदलला पण माझं मन नाही. माझ उत्तर अजूनही तेच आहे.' लक्ष्मीने ऍसिड हल्ल्यानंतर प्रेम, लग्न या शब्दांबद्दल विचार करणं सोडून दिलं होतं. आपल्या जीवनात खरं प्रेम येईल ही आशाच तिने सोडली होती.
याचवेळी लक्ष्मी आणि अलोक यांची ओळख एका कामानिमित्त झाली. पण अलोक त्यापूर्वीपासूनच लक्ष्मीच्या शोधात होता. अलोकला तिच्याबद्दल आत्मियता होती. त्याच्या या भावनेचं रुपांतर पुढे प्रेमात झालं.
अलोक आणि लक्ष्मी यांनी लग्न न करता लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. कारण लक्ष्मी-अलोकचं प्रेम पवित्र होतं. पण त्यांच्या लग्नात उपस्थित राहणारी मंडळी त्यांच प्रेम न पाहता लक्ष्मीचा चेहरा पाहण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी येणार. ही गोष्ट अलोकला मान्य नव्हती, त्यामुळे त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मरेपर्यंत एकत्र राहण्याचा त्यांचा निर्णय कुटुंबियांनी देखील स्विकारला. अलोक आणि लक्ष्मी Stop Acid Attack वर एकत्र काम करत होते. पण काही मतभेदांमुळे हे दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. अलोक आणि लक्ष्मीला पिहू नावाची मुलगी आहे. जिचा ताबा लक्ष्मीकडे आहे.
'छपाक' सिनेमाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी खऱ्या मालती आणि अमोलची गोष्ट शेअर केली आहे. लक्ष्मी आणि अलोकच्या प्रेमाबद्दल दीपिका म्हणते की,'त्यांच प्रेम हे इतरांच्या प्रेमाप्रमाणेच आहे. पण त्यांच प्रेम हे अतिशय पवित्र आहे.' जेव्हा पण हे सीन शूट व्हायचे तेव्हा आम्ही अगदी 13 वर्षांच्या मुलींसारख्या वागायचो, असं दीपिका सांगते.