`छत्रपती शिवरायांची भूमिका या पुढे करणार नाही` चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय
गेल्या अनेक दिवसांपासून मांडलेकर कुटूंबीय वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आणि यामागचं कारण म्हणजे त्यांच्या मुलाचं नाव.
मुंबई : अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याचे कुटुंब एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मांडलेकर कुटूंबीय वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आणि यामागचं कारण म्हणजे त्यांच्या मुलाचं नाव. चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकरने त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर ठेवलं आहे. आणि यामुळेचं यादीही बराच वाद झाला आहे. यामुळे या जोडीला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र आता चिन्मयने यामुळेच एक मोठा निर्णय घेतला आहे.
यापुढे कधीच 'छत्रपती शिवरायांची भूमिका या पुढे करणार नाही' असं मत त्याने व्हिडीओच्या माध्यमातून मांडलं आहे. शेअर केलेल्या व्हिडीओत चिन्मय म्हणाला, नमस्कार माझं नाव चिन्मय मांडलेकर, व्यवसायाने मी एक अभिनेता आहे. लेखक आहे दिग्दर्शक आहे निर्माताही आहे. काल माझ्या पत्नीने नेहाने इन्साग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ होता माझ्या मुलाला ज्याचं नावं जहांगिर आहे. त्याच्या नावावरुन आम्हाला होणारं ट्रोलिंग. आणि त्याच्या नावावरुन आम्हाला येणाऱ्या अतिशय घाणेरड्या कमेंट्स. हा व्हिडीओ पोस्ट करुन सुद्धा कमेंट्समध्ये काही कमी झालीये का तर अजिबात नाही. इनपॅक्ट त्या वाढल्यात. आणि आता ती लोकं मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापासून सगळ्यावर शंका घेवू लागलेले आहेत. एक व्यक्ती म्हणून मला त्याचा खूप त्रास होतो. मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला आणि माझ्या पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर होत असेल सोशल मीडियावरुन तर त्याच्यासाठी मी बांधिल नाहीये. माझ्या कामाबद्दल तुम्ही मला वाट्टेल ते बोलू शकता. आवडलं नाही आवडलं पर्सनली भेटून किंवा सोशल मीडियावरुन पण माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे असं मला वाटत नाही.
पुढे अभिनेता म्हणाला , 'मी माझ्या मुलाचं नाव जहांगिर का ठेवलं याविषयी मी अनेकदा यापुर्वी बोललो आहे. जर कोणाला ईच्छा असेल तर त्याने ते पहावेत. काल जेव्हा नेहाने सुद्धा व्हिडीओ बनवला तेव्हा तिनेही त्यामागचं कारण सांगितलं आहे. पण त्याचा आता मी पाठपुरवठा करण्यात माझा वेळ वाया घालवणार नाही. मला इतकंच सांगायचं आहे. मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो . मी आत्तापर्यंत सहा चित्रपटांमध्ये ती केली. आणि तरिही माझ्या मुलाचं नाव जहांगिर का? असा त्य़ा ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे. कारण माझ्या मुलाचा जन्म २०१३ साली झालाय आणि आज तो ११ वर्षांचा आहे. आणि हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं. ते आत्ता होतंय. त्यामुळे मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेने आत्तापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, देशातल्या आणि देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठी नाही तर अमराठी लोकांचं सुद्धा प्रेम दिलं. पण आता जर त्या भूमिकेमुळे माझ्या कुटूंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रता पुर्वक सांगू ईच्छितो की ईथून पुढे मी ही भूमिका करणार नाही.'
पुढे अभिनेता म्हणाला , 'कारण मी करत असलेलं काम मी करत असलेली भूमिका याचा माझ्या कुटूंबाला जर मानसिक त्रास होत असेलं तर एक वडिल म्हणून एक नवरा म्हणून एक कुटूंब प्रमुख म्हणून मला माझं कुटूंब जपणं खूप जास्त महत्वाचं आहे. मला याचं वाईट वाटतंय का तर होय मला याचं खूप वाईट वाटतंय. कारण माझ्या आयुष्यात महाराजांची जी भक्ती प्रेम होतं त्याचं एक्सप्रेशन म्हणजे ही भूमिका होती. आणि तसे पर्सनल एक्सपिरिन्स खूप आहेत. अगदी माझ्या गाडीत सुद्दा जिथे लोक गणपतीची मुर्ती ठेवतात तिथे महाराजांची मुर्ती आहे आणि हा दिखावा नाही प्रेम आहे. पण आरल्या प्रेमाचं आणि भक्तीचं स्पष्टीकरण मी लोकांना का द्यावं आणि लोकांनी तरी ते का ऐकावं. त्यांना काय दिसतं मुलाचं नाव जहांगिर ठेवलं. माझं एकच म्हणणं आहे. माझ्या मुलाचं नाव जहांगिर आहे खटकतंय मग जहांगिर आर्ट गॅलरीचं नाव बदलणारेत का? जहांगिर नावाच्या एका माणसाला देशाने भारतरत्न दिलाय. भारतरत्न जहांगिर रतन टाटा. JRD TATA . त्या JRD TATA यानी उभी केलेली एअर इंडिया त्यातून आपण विमानाने प्रवास करतो.'
पुढे अभिनेता म्हणाला , 'त्यांनी उभे केलेले अनेक उद्योगाचा फायदा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला होतो. त्यांचा वापर करताना आपण हा विचार करतो का? टायटनची घड्याळं ते जे लोकं त्यांच्या इथे काम करतात त्यांच्या गाड्या. आपण विचार नाही करत त्यांचं नाव जहांगिर होतं. पण ठिकेय मी एक अभिनेता आहे. अभिनेते नेहमीच एक सॉफ्ट टार्गेट असतात. ईथे अजून एक गोष्ट मी नमूद करु ईच्छितो अनेक लोकांनी त्या ट्रोलिंगमध्ये असंही म्हटलेलं आहे. तुम्ही एका विशिष्ट राजकिय विचार सरणीला खत पाणी घातलं. मग आता तुम्हाला हे होणारच तर माझं तुम्हाला हे चॅलेंज आहे कोणीही दाखवून द्यावं की मी आज पर्यंत कुठल्या राजकिय पक्षाचा प्रचार केलाय.'
पुढे अभिनेता म्हणाला , 'मी कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या प्लॅटफॉर्मवर गेलोय. किवा मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याच्या किंवा पक्षाच्या अधिपत्याखाली वावरलोय. असं कधीच नाही झालंय. माझी राजकीय विचारसरणी स्वतंत्र आहे. किंबहूना ज्या पॉडकास्टवरुन हे सुरु झालं त्या पॉडकास्टमध्ये सुद्धा मी हे नमूद केलंय की, दर निवडणूकीत ठरवून वेगळ्या पक्षाला मतदान करणारा मी एक सुजाण मतदार आहे. असो या सगळ्याचं स्पष्टीकरण देण्यात काहीच अर्थ नाहीये. महाराजांच्या भूमिकेने मला आत्तापर्यंत खूप प्रेम दिलं. पण जर महाराजांची भूमिका केली म्हणून माझ्या कुटूंबाला माझ्या ११ वर्षाच्या मुलाला या मानसिक त्रासाला सामोर जावं लागत असेल तर त्यांची माफी मागून मी तुम्हा सगळ्यांसमोर हे जाहिर करु ईच्छितो, इथून पुढे महाराजांची भूमिका नाही करणार नमस्कार.'' असा व्हिडीओ शेअर करत चिन्मय व्यक्त झाला आहे.