मुंबई : चित्रपटांपेक्षाही एका भूमिकेनं अभिनेते शिवाजी साटम यांना खास ओळख दिली, घराघरात पोहोचवलं. ही भूमिका म्हणजे 'एसीपी प्रद्युम्न'. cid या मालिकेमध्ये साटम यांनी साकारलेली ही भूमिका कित्येक वर्षे त्यांना लोकप्रियता देऊन गेली. पण, मालिका बंद झाल्यानंतर मात्र हे चित्र बदललं. खुद्द साटम यांनीच एका मुलाखतीत वास्तव सर्वांसमोर ठेवलं. (Shivaji Satam)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला कमाच्या मिळणाऱ्या अतिशय कमी संधींबाबत त्यांनी केलेलं वक्तव्य पाहता, खरंच... 'कुछ तो गडबड है...' असंच चाहतेही म्हणाले. 


'मी नाही म्हणणार की, मला बऱ्याच ऑफर्स मिळताहेत. नाही मिळत तर, नाहीच म्हणणार. सद्या एक किंवा दोन प्रस्ताव आहेत, तेसुद्धा फारसे आवडलेले नाहीत.


मी मराठी रंगभूमीतील माणूस आहे, मला आवडलेलीच कामं मी आजवर केली', असं साटम यांनी स्पष्ट केलं. 


हे माझं दुर्दैव आहे, की अद्याप कोणतंही दमदार पात्र माझ्यासाठी लिहिलं गेलं नाही. मी यावर काहीच करु शकत नाही, हा दोन्ही बाजुंनी होणारा तोटा आहे, असं ते म्हणाले. 


एक अभिनेता म्हणून हा माझा तोटा आणि प्रेक्षक म्हणून ते एका चांगल्या पात्राला मुकले हा त्यांचा तोटा, अशा शब्दांत त्यांनी हे चित्र अधिक स्पष्ट केलं. 


सध्या साटम कोरोनाच्या भीतीनं नव्हे, तर काम नसल्या कारणाने घरातच आहेत. याचाच आपल्याला कंटाळा आला असल्याची भावना त्यांनी मुलाखतीत व्यक्त केली. 


उद्या सकाळ जर सीआयडी पुन्हा सुरु झालं, तर हा प्रोजेक्ट स्वीकारणाऱ्यांपैकी मी पहिला असेन; कारण मी पात्र साकारून नाही तर घरात राहून कंटाळलोय. 


1997 पासून साकारतायेत एसीपी... 
सीआयडी या कार्यक्रमाचा पहिला भाग 1997 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासून शिवाजी साटम 'एसीपी प्रद्युम्न' ही भूमिका साकारत होते. 


या कार्यक्रमाचे तब्बल 1500 भाग आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि त्यांना भरघोस प्रतिसादही मिळाला. भारतीय टेलिव्हीजन जगतात दीर्घ काळ चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सीआयडीचाही समावेश होतो.