मुंबई: सध्याच्या घडीला नाना- तनुश्री वादाचीच चर्चा सुरु असून विविध कार्यक्रम आणि पत्रकार परिषदांमध्ये कलाकारांनाही त्याविषयीच प्रश्न विचारण्यात येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोप- प्रत्यारोपांच्या या प्रकरणावर आता आणखी एका अभिनेत्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या अभिनेत्याचं नाव आहे, कपिल शर्मा. 


आपल्या विनोदी शैलीच्या बळावर विनोदवीर ते अभिनेता असा प्रवास करणाऱ्य़ा कपिल शर्माने आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात उडी घेतली आहे. त्याच्याच निर्मितीत साकारलेल्या 'सन ऑफ मनजीत सिंग' या चित्रपटाच्या प्रसिद्धीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला त्याने हजेरी लावली होती. यावेळी त्याला नाना- तनुश्री वादाविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. 


बहुचर्चित अशा या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया देत कपिल म्हणाला, 'आधी मी प्रत्येक लहानमोठ्या मुद्द्यावर प्रतिक्रिया द्यायचो. पण, त्यामुळे मीच कायद्याच्या कचाट्यात येऊ लागलो, अडचणीत येऊ लागलो. प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होण्याच्या स्वभावामुळे हे होत होतं.' 


नाना- तनुश्री वादाविषयी आपल्याला पुरेशी माहिती नसल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं. त्यासोबतच जर तनुश्रीने खरंच अशा प्रसंगाचा सामना केला असेल, तर ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, असंही तो म्हणाला. 


कपिलचं हे वक्तव्य आणि तनुश्रीने नानांवर केलेले आरोप पाहता अप्रत्यक्षपणे त्याने तनुश्रीची साथ दिल्याचं स्पष्ट होत आहे. 


आपण स्वत:सुद्धा छेडछाड आणि त्यासंबंधीच्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांच्या अनुषंगाने काही उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता हा मुद्दाही त्याने इथे अधोरेखित केला. 


गेल्या बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यापासून दूर असणारा हा विनोदवीर अभिनेता आता पुन्हा एकदा त्याच दणक्यात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी तयार आहे. त्यामुळे आता कपिलची ही इनिंग त्याला पुन्हा यशाच्या शिखरावर पोहोचवणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.