मुंबई : कलाकार हा त्याच्या कलेच्या बळावर मोठा होतो. किंबहुना या प्रवासामध्ये त्याला काही आव्हानांचाही सामना करावा लागतो. मुख्य म्हणजे कलाविश्वात काही अपवाद वगळले तर संघर्षाचा काळ हा कलाकारांना चुकलेला नाहीत. अनेकजण तर याच संघर्षातून घडतात आणि मोठे होतात. या झगमगाटाच्या विश्वात येण्यापूर्वीच्या झळा त्यांना अपेक्षित असतात. पण, या झळा जेव्हा त्यांच्या आत्मविश्वासावरच घाला घालू पाहतात तेव्हा मात्र अडचणीची परिस्थिती उदभवू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ण, भाषा, राहणीमान आणि उंची... होय उंची सुद्धा. हे असे घटक आहेत ज्यावरुन काही कलाकारांना असं काही ऐकावं लागतं जे खरंतर संताप देणारं असतं. पण, तरीही ही मंडळी तितक्याच सौम्यपणे हे सारंकाही ऐकून घेतात. त्याकडे फार गांभीर्यानं पाहत नाहीत. कारण, रसिकांना त्यांनी मायबापाचा दर्जा दिलेला असतो आणि सहकलाकारांना मार्गदर्शकांचा. इथं मुद्दा हा आहे, की कलाकार लहान असो किंवा मोठा, त्याचा मान हा राखलाच गेला पाहिजे. यावरच भाष्य करणारी आणि काहीशी भावनात्मक सूर असणारी पोस्ट लिहिली आहे, 'चला हवा येऊ द्या' फेम, अंकुर विठ्ठलराव वाढवे यानं. 


अंकुरचं साकारत असणारं पात्र अनेकदा 'चला हवा येऊ द्या'मध्ये अशी काही जादू करुन जातं की प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. पण, याच अंकुरनं आता त्याच्या कमी उंचीचा मुद्दा अधोरेखित करत एक कविता सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यानं जाहीर माफी मागत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


'मला छोटू म्हणा 
बुटक्या म्हणा.....'
, अशी सुरुवात करत त्याला कित्येकदा ऐकाव्या लागलेल्या, थट्टेचा विषय ठरलेल्या ओळी लिहिल्या आहेत. या ओळी वाचताना एखाद्याच्या मनावर साध्या थट्टेनंही कुठवर परिणाम होऊ शकतो हे स्पष्ट दिसत आहे.


सगळ्यांच्या भावनांचा आदर ठेवून माझ्या स्वतःच्या भावना व्यक्त करतोय माझ्या मुळे भावना दुखावलेल्यांची जाहीर माफी...

Posted by Ankur Vitthalrao Wadhave on Wednesday, August 12, 2020

 


'भावना माझ्या  दुखणार नाहीत 
होय, नाही दुखणार 
भावना उथळ असतात...
त्या आता माझ्या दुखावून दुखावून 
झाल्या बोथट',
असं लिहित भावनाही आता बोथट झाल्या आहेत हे त्याचे शब्द चाहत्यांसह फक्त अंकुरच नव्हे तर त्याच्यासारख्या अनेकांची खिल्ली उडवणाऱ्यांचे डोळे उघडत आहेत. सोशल मीडियावर एक कलाकार म्हणून त्यानं ही पोस्ट लिहिताच कमेंट बॉक्समध्ये अनेकांनीच अंकुरच्या कलेची दाद दिली आहे.