CONFIRMED : आणखी एका सेलिब्रिटी जोडीनं दिली नात्याची कबुली
यावेळी त्यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला....
मुंबई : मागील काही काळापासून बऱ्याच सेलिब्रिटींनी त्यांच्या नात्याची ग्वाही देत एका नव्या प्रवासाची सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. हिंदी, मराठी अशा सर्वच कलाजगतांमध्ये लग्नसराईचे वारेही वाहत असल्याचं पाहायला मिळालं. आता याच वातावरणात आणखी एका सेलिब्रिटी जोडीची भर पडली आहे.
काही दिवसांपासूनच अनेकांचं लक्ष वेधणारी ही जोडी आहे गौहर खान आणि झैद दरबार यांची. अतिशय गोड अंदाजात या जोडीनं त्यांच्या नात्याची ग्वाही देत अखेर त्यावर शिक्कामोर्तब केलं. पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये हे दोघंही एकमेकांच्या डोळ्यांत पाहात असून त्यांच्या या नात्याची सुरेख बाजू हा फोटो मांडत आहे.
झैद दरबार हा संगीत दिग्दर्शत इस्माइल दरबार यांचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वीच इस्माईल दरबार यांना मुलाच्या लग्नाविषयीचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचेच कान टवकारले होते.
'हे सहाजिकच आहे की, मी सूनही आणणार. आता ते दिवस गेले जेव्हा पालक त्यांच्या मुलांसाठी सून शोधायचे. हल्ली मुलंच सांगातात, बाबा मला ही मुलगी आवडते आणि आपल्यालाही त्यांचं ऐकावं लागतं. त्यांच्या निवडीला पाठिंबा द्यावा लागतो', असं म्हणत आपल्या मुलाच्या निवडीवर माझी कोणतीही हरकत नसेल असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जेव्हा आयएएनएसनं गौहरला झैद आणि तिच्या साखरपुड्याबाबत विचारलं होतं, तेव्हा तिनं या अफवा असल्याचं म्हटलं होतं. किंबहुना तसं काही असल्याच मी तुम्हाला नक्की सांगेन असं म्हणत तिनं सर्वांनाच आश्वस्त केलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार ही जोडी डिसेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे.