मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या बहुचर्चित इंदू सरकार सिनेमाला असलेला विरोध वाढत चाललाय. येत्या 28 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे, पण काँग्रेसच्या विरोधामुळं तो लांबणीवर पडणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या या सिनेमात मधुर भांडारकर यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस नेते संजय गांधी यांची बदनामी केल्याचा आक्षेप काँग्रेसनं घेतलाय. त्यावरून देशभरात विरोधाची आंधी पसरलीय. सिनेमाच्या प्रमोशनसाठी भांडारकर पुण्याला आणि नागपूरला गेले होते, मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे त्यांना आपली पत्रकार परिषद गुंडाळावी लागली. हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका काँग्रेसनं घेतलीय.


इंदू सरकार या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं मंजुरी दिली आहे. पण काँग्रेसच्या या सेन्सॉरशीपविरोधात मधूर भांडारकर यांनी नाराजी व्यक्त केलीय. प्रिय राहुल गांधी पुण्यापाठोपाठ मला नागपुरातील पत्रकार परिषदही रद्द करावी लागली. याला आपण गुंडागर्दी नाही का म्हणणार? मला मतस्वातंत्र्य नाही का? असा सवाल त्यांनी थेट राहुल गांधींना ट्वीट करून केलाय.


याआधी इंदिरा गांधी आणि आणीबाणीवर बेतलेले आंधी आणि किस्सा कुर्सी का या सिनेमांची देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोंडी केली होती. जनता पार्टीचं सरकार आल्यानंतरच आंधी प्रदर्शित झाला होता. आता माँ बेटे की सरकार अशी टीका करत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या काळात इंदू सरकार येतोय, हे विशेष... या सगळ्या वादामुळं सिनेमा वेळेवर प्रदर्शित होईल का? आणि या पब्लिसिटीचा फायदा सिनेमाला होईल का? याकडं आता लक्ष लागलंय.