`मोदींवर बूट फेकणाऱ्याला १ लाखांचं बक्षीस देणार`
`पद्मावती`च्या वादात एका सिनेनिर्मात्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.
नवी दिल्ली : 'पद्मावती'च्या वादात एका सिनेनिर्मात्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.
मुंबईच्या या सिनेनिर्मात्याचं नाव राम सुब्रह्मण्यम असं आहे. 'पद्मावती'च्या वादानंतर देशाच्या बदलत चाललेल्या संस्कृतीवर टीका करत त्यांनी भाजप सरकारवर उपरोधिक टीका केलीय.
'जो कुणीही व्यक्ती पंतप्रधान मोदींवर बूट किंवा चप्पल फेकेल त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल' असं वादग्रस्त ट्विट राम सुब्रह्मण्यम यांनी केलंय.
'भारताच्या नव्या संस्कृतीत तुमचं स्वागत आहे. या संस्कृतीची पायाभरणी भाजपनं केलीय' असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, याआधी हरियाणाच्या सूरज पाल अमू नावाच्या एका भाजप नेत्यानं 'पद्मावती'ची अभिनेत्री दीपिका पादूकोणचं शीर धडावेगळं करणाऱ्याला १० करोड रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यावर सर्वच स्तरांतून टीका करण्यात आली. भाजपनंही आपल्या नेत्याला नोटीस धाडून याचा जाब विचारला होता.