अभिनेता मन्सूर अली खानने आपली लिओ चित्रपटातील सह-अभिनेत्री त्रिशाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ माजली असून दिग्दर्शक लोकेश कांगाराज, चिरंजीवी आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी यावर नाराजी जाहीर करत खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान मन्सूर अली खानने चेन्नईत पत्रकार परिषद घेत आपल्या विधानाबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे. तर आपल्यावर बंदी घालणाऱ्या नादीगर संगम या चित्रपट संघटनेला अल्टिमेटम दिला आहे. या संघटनेने मन्सूर अली खानवर तात्पुरती बंदी घातली आहे. 


"मी त्रिशाची माफी मागणार नाही"


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मन्सूर अली खानने आपल्या भाषणात म्हटलं होतं की, मी लिओ चित्रपटाचा भाग असतानाही त्रिशासह माझे काही सीन नाहीत. यानंतर त्याने पुढे मर्यादा ओलांडत म्हटलं की, त्रिशासह बेडरुम सीन करण्याची माझी संधी हुकली.


या वक्तव्यानंतर नादीगर संगमने मन्सूर अली खानवर तात्पुरती बंदी घातली. यानंतर 21 नोव्हेंबरला मन्सूर अली खानने पत्रकार परिषद घेतली. जोपर्यंत चूक लक्षात येत नाही आणि माफी मागत नाही तोवर बंदी मागे घेणार नाही हे संघटनेने स्पष्ट केलं आहे. 


मन्सूर अली खानने पत्रकार परिषदेत म्हटलं की, "नादीगर संगमने माझ्यावर बंदी घालून मोठी चूक केली आहे. जेव्हा अशी एखादी गोष्ट होते तेव्हा त्यांनी मला साधं स्पष्टीकरणही मागितलं नाही. त्यांनी मला फोन करुन किंवा नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागायला हवं होतं. यासंबंधी चौकशी व्हायला हवी. पण तसं झालं नाही".


"माझ्याविरोधात त्यांनी केलेली विधानं मागे घेण्यासाठी मी त्यांना 4 तासांचा वेळ देत आहे. मी माफी मागावी असं त्यांचं म्हणणं आहे. मी माफी मागणाऱ्यातला वाटतो का? मीडिया माझ्याविरोधात जे हवं ते लिहू शकते. मी कोण आहे हे लोकांना माहिती आहे. मला लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे," असं पुढे त्याने म्हटलं.


पुढे त्याने म्हटलं की, "मीडियाने माझं वक्तव्य छापताना त्रिशा आणि माझा आजुबाजूला फोटो लावला आहे. आम्ही त्यात नवरा-बायकोप्रमाणे दिसत आहोत. तुम्ही माझा चांगला फोटो वापरु शकत नव्हता का? काही फोटोत मी चांगला दिसत आहे".


तसंच आपल्या विधानावर ठाम राहत त्याने म्हटलं की, "चित्रपटातील रेप सीन म्हणजे नेमकं काय असतं? याचा अर्थ खरंच बलात्कार करणं होतो का? सिनेमात हत्येचा सीन असतो तेव्हा खरंच हत्या होते का? काहीतरी अक्कल वापरली पाहिजे. मी काहीच चुकीचं बोललो नसल्याने माफी मागणार नाही".


त्रिशानेही व्यक्त केला संताप


अभिनेत्री त्रिशाही मन्सूर अली खानच्या या विधानावर व्यक्त झाली आहे. "अलीकडेच एक व्हिडिओ माझ्या निदर्शनास आला आहे ज्यामध्ये मन्सूर अली खान यांनी माझ्याबद्दल नीच आणि घृणास्पद रीतीने बोललं आहे. मी याचा तीव्र निषेध करते. हे लैंगिक, अनादरपूर्ण, गैरवर्तनवादी, तिरस्करणीय आहे. तो इच्छा ठेवू शकतो पण त्याच्यासारख्या घाणेरड्या व्यक्तीसोबत स्क्रीन स्पेस शेअर न केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या उर्वरित चित्रपट कारकिर्दीतही असं कधीही होणार नाही याची मी खात्री करेन. त्याच्यासारखे लोक माणूस जातीला बदनाम करतात", असा संताप तिने पोस्टमधून व्यक्त केला आहे. 



लिओ चित्रपटात त्रिशासह विजय प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाने जगभरात 600 कोटींची कमाई केली आहे.