आई-वडीलांना मरण्यासाठी सोडू शकत नाही, अक्षय कुमारचे भावनिक आवाहन
अभिनेता अक्षय कुमारचे २५ कोटींचे सहाय्य
नवी दिल्ली : कोरोना वायरसपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. तसेच पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत समाजातील अनेक मान्यवर स्वत:हून पुढे आले आहेत. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार देखील असून त्याने तात्काळ २५ कोटींचे सहाय्य केले आहे. हे सहाय्य अक्षयतर्फे नसून त्याच्या आईकडून असल्याचे त्याने सांगितले.
जेव्हा तो कोणतेही सहाय्य करतो त्याबाबतीत बोलणं त्याला आवडतं नाही. या भावना प्रकट करणं त्याच्यासाठी कठीण असल्याचे त्याने 'झी न्यूज'शी बोलताना सांगितले.
मी कोण आहे चॅरिटी करणारा ?, आपण आपल्या देशाला भारत माता म्हणतो. हा निधी माझ्या आईकडून माझ्या आईसाठी असल्याचे तो म्हणाला. इथे माझ्या आईचा उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण कोरोनाच्या संकटात ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष होण्याची भीती वाटते.
माझ्या आईचा जीव माझ्यासाठी प्रिय आहे. कोणाच्याही आई-वडीलांना मरण्यासाठी सोडू शकत नाही. एक-एक आयुष्य वाचणं यावेळी माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे मी केवळ माझं कर्तव्य केलंय असेही तो म्हणाला.
भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ९०० च्या जवळ जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे १६७ रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. जनतेने येत्या काही दिवसात घराबाहेर पडू नये, असं आवाहन सगळेच करत आहेत.
कोरोनाचा सामना करण्यासाठी तुमच्याकडून आर्थिक मदतीची गरज आहे. तुमचं छोट्यातलं छोटं दान आम्ही स्वीकारू, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. मोदींच्या या आवाहानाला बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने एका तासाच्या आत प्रतिसाद दिला. कोरोनाचा हा वाढता धोका लक्षात घेता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार मदतीला धावला आहे. अक्षय कुमारने प्रधानमंत्री सहायता निधीला २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. याबाबतचं एक ट्विट अक्षय कुमारने केलं आहे.
अक्षय कुमार याच्यासोबतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही मदत केली आहे. सचिनने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपये आणि प्रधानमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपये दिले आहेत.