वरूणच्या चाहतीने नताशाला जीवे मारण्याची दिली धमकी
वरूणला भेटता आले नसल्यामुळे तिने नताशाला मारण्याची धमकी दिली.
मुंबई : अभिनेता वरूण धवण सध्या एका चक्रव्युहात सापडला आहे. त्याची एक चाहती सतत त्याला धमकी देत आहे. तर ही चाहती चक्क त्याची गर्लफ्रेंड नताशाला जीवे मारण्याची धमकी देत आहे. तिला वरूणला भेटता आले नसल्यामुळे तिने नताशाला मारण्याची धमकी दिली. वरूण नेहमीच त्याच्या चाहत्यांसाठी वेळ काढत असतो. पण सध्या वरूण 'कलंक' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. गेल्या काही दिवसांपासुन ही चाहती वरूणला भेटण्यासाठी प्रयत्न करत आहे. शुक्रवारी ती चक्क त्याच्या घरी पोहली आणि गोंधळ घातला.
वरील सर्व घटना वरूणने त्याच्या सुरक्षा रक्षकांना सांगितले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी चाहतीला अनेक पद्धतीने समजावून पाहिले. पण तिने स्वत:ला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने अचानक नताशाला जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सुरक्षा रक्षकांनी पोलीसांकडे धाव घेतली. सांताक्रूझच्या पोलिस ठाण्यात त्या चाहती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. वरूणची बाजू ऐकून घेतल्यानंतरच आम्ही एफआयआर दाखल करू, असे पोलिसांनी म्हटले.
बहुप्रतिक्षित 'कलंक' चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा त्याचप्रमाणे अभिनेता संजय दत्त, वरूण धवण, आदित्य राय कपूर अशी तगडी स्टारकास्ट झळकणार आहेत.