अनुष्काचा `बेबी बंप` लूक पाहून विराटची भन्नाट प्रतिक्रिया
फोटो पाहून म्हणाला....
मुंबई : अभिनेत्री anushka sharma अनुष्का शर्मा आणि तिचा पती, क्रिकेटर विराट कोहली यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याविषयीची गोड बातमी जाहीर केली. सोशल मीडियाच्याच माध्यमातून विरुष्कानं सर्वांना ही बातमी दिली आणि असंख्य शुभेच्छांचा स्वीकार केला. ज्यानंतर आता अनुष्कानं तिच्या 'बेबी बंप' लूकमधील फोटो शेअर केला. अतिशय भावनिक आणि समर्पक असं कॅप्शन देत तिनं हा फोटो शेअर केला. जो पाहून तिच्या कलाकार मित्रमंडळींपासून खुद्द पती विराट कोहलीनंही अतिशय सुरेख प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.
समुद्रकिनारी उभं राहून एका नव्या जगण्याबाबत आणि आयुष्यातील एका नव्या पर्वाबाबत कृतज्ञता व्यक्त करत तिनं हा फोटो पोस्ट केला. यामध्ये ती बेबी बंप लूकमध्ये अतिशय सुरेख दिसत आहे. एक आयुष्यच तुमच्यामध्ये साकारलं जाणं याहून बाकी काहीच इतकं वास्तविक आणि विनम्र नसेल. जर हेच तुमच्या नियंत्रणात नसेल तर आणखी काय असेल...?
पत्नीचा हा फोटो पाहून विराटनं आपलं सारं आयुष्य या एका फोटो फ्रेममध्ये सामावलं आहे अशी, प्रतिक्रिया दिली. अतिशय मनापासून विराटनं दिलेली ही प्रतिक्रिया पाहता, सर्वांनाच या सेलिब्रिटी जोडीचा हेवा वाटत आहे. एक पिता आणि पती म्हणून विराट सध्या त्याची पूर्ण जबाबदारी पार पाडत आहे.