तिरुवअनंतपूरम : दाक्षिणात्य कलाविश्व आणि संगीत क्षेत्रात प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या गायक, व्हायोलिन वादक बालाभास्कर यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीची जबाबदारी आता क्राईम ब्रांच अर्थात गुन्हे शाखेच्या हाती देण्यात आली आहे. 'टीएनएम'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पोलीस महासंचालक लोकनाथ बेहेरा यांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले आहे. बालाभास्कर यांच्या वडिलांच्या मागणीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, पुढे या अपघाताच्या तपासणीसाठी एका नव्या चमूच्या हाती ही जबाबदारी देण्यात येणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्याने हे प्रकरण तपासणीसाठी सुरु होण्यापूर्वी पोलीस उपअधिक्षक अनिल कुमार आणि त्यांची टीम सदर प्रकरणीचा तपास करत होती. पण, त्यांना या साऱ्यात कोणतीच संशयास्पद बाब आढळली नव्हती. 'सध्या हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आल्याचं कळत आहे. आम्ही याविषयीच्या अधिकृत आदेशांच्या प्रतिक्षेत आहोत. अधिकृत आदेश मिळताच हे प्रकरण आम्ही त्यांना सोपवू', असं कुमार 'टीएनएम'ला दिलेल्या माहितीत म्हणाले.


काही महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातामध्ये बालाभास्कर यांच्या मुलीला जीव गमवावा लागला होता. तर, काही दिवस अतिद्क्षता विभागात मृत्यूशी झुंज दिल्यांनंतर बालाभास्कर यांचीही प्राणज्योत मालवली होती. अपघातातून त्यांची पत्नी आणि कार चालक बचावले होते. हे सारं प्रकरण पाहता बालाभास्कर यांच्या वडिलांनी पैशांच्या कारणावरुन अपघात घडवून आणल्याचं म्हणत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 


तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर तपास पूर्ण होण्यापूर्वी आपल्या कुटुंबाचा जबाब कोणीच नोंदवला नसून, चौकशी चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला होता. ज्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी या प्रकरणात डोकावत क्राईम ब्रांचकडे हे प्रकरण सोपवण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. 


बालाभास्कर यांचा अपघात झाला त्यावेळी त्यांचा मित्र अर्जुन कार चालवत होता. त्यावेळी कारमधून खुद्द बालाभास्कर, त्यांची पत्नी लक्ष्मी आणि मुलगी तेजस्वीनी प्रवास करत होते. दरम्यान, कार चालवणाऱ्या अर्जुनवर याआधी दोन प्रकरणांमध्ये पोलिसांत गुन्हा दाखल असल्याचं कळत आहे. पण, त्याच्या नावे असणाऱ्या गुन्हयांचा आणि अपघाताचा काहीच संबंध नसल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे आता अपघाताच्या या प्रकरणाचा तपास कोणत्या अंतिम टप्प्यावर पोहोचणार हाच महत्त्वाचा प्रश्न उभा राहत आहे. 




कधी झाला होता अपघात? 


२५ सप्टेंबर रोजी बालाभास्कर त्यांची पत्नी आणि मुलीसह थ्रिसूर येथून तिरुवअनंतपूरमच्या दिशेने येत होते. त्यावेळी अर्जुन कार चालवत होता. एका मंदिर दर्शनाहून परतत असताना तिरुवअनंतपूरम येथील पल्लीपूरमजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये त्यांच्या मुलीचे जागीच प्राण गेले. तर, गंभीररित्या जखमी झाल्यामुळे बालाभास्कर, त्यांची पत्नी आणि अर्जुन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांनी बालाभास्कर यांचीही प्राणज्योत मालवली. तर अर्जुन आणि बालाभास्कर यांची पत्नी मात्र या अपघातातून बचावली होती.