कोकणातील दशावतारातील `लोकराजा` सुधीर कलिंगण यांचे निधन
सुधीर कलिंगण हे ५३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून सुधीर कलिंगण यांची प्रकृती बिघडली होती
मुंबई : कोकणातील दशावतार लोककलेवर शोककळा पसरली आहे. दशावतार लोककलेतील प्रख्यात कलावंत सुधीर कलिंगण यांचे आज पहाटे दोनच्या सुमारास झाले निधन झाले. सुधीर कलिंगण यांच्यावर गोवा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.
सुधीर कलिंगण हे ५३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून सुधीर कलिंगण यांची प्रकृती बिघडली होती.
अखेर पहाटे दोनच्या सुमारास सुधीर कलिंगण यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे दशावतारी नाट्यक्षेत्राचा एक मोठा आधारस्तंभ हरपला आहे.
सुधीर कलिंगण यांच्या जाण्याने दशावतार लोककलेची मोठी हानी झाली आहे, अशी खंत व्यक्त केली जात आहे.
सुपुत्र सुधीर कलिंगण हे सुप्रसिद्ध दशावतार बाबी कलिंगण यांचे सुपुत्र. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1969 साली झाला.
सुधीर कलिंगण हे श्री कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळाचे मालक होते. . सुधीर कलिंगण यांनी आपल्या वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे नेला.
पारंपरिक दशावतारी कलेचे आधुनिकीकरण करणाऱ्या नवीन नाट्यनिर्मिती सादर करून त्यांनी आपला ठसा उमटवला.
दशावतारी राजा म्हणून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या होत्या. त्यांना दशावताराचा लोकराज म्हणून ओळखले जात असे.
सुधीर कलिंगण यांनी दशावतार लोककलेत राजा, स्त्री वेशातील भूमिका तसेच अनेक वेगवेगळ्या भूमिका सुद्धा त्यांनी दशावतार लोककलेत अजरामर केल्या.
त्यामुळेच त्यांना रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेत 'लोकराजा' ही पदवी बहाल केली गेली.कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील रहिवासी व प्रसिद्ध दशावतार कलाकार सुधीर कलिंगण यांच्या निधनाने सिंधुदूर्ग जिल्ह्यासह कोकणात शोककळा पसरली आहे.