बिग बींच्या चित्रपटाचा रिमेक; हृतिक-दीपिकाच्या जोडीला पसंती
बिग बींच्या या सुपटहिट चित्रपटातून हृतिक-दीपिका ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज
मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी 'सुपर ३०' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'सुपर ३०' येत्या १२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासह हृतिक आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. ती चर्चा आहे हृतिक आणि दीपिका पदुकोणच्या आगामी चित्रपटाची. हृतिक-दीपिका ही जोडी लवकरच आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं बोललं जात आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका आणि हृतिक ही जोडी फराह खान दिग्दर्शित आगामी 'सत्ते पे सत्ता' चित्रपटाच्या रिमेकमध्ये भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. रोहित शेट्टी या 'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकची निर्मिती करणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटासाठी शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार या अभिनेत्यांची नावं समोर आली होती. परंतु आता आगामी 'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकमध्ये हृतिक रोशनचं नाव निश्चित करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
बिग बी अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या १९८२ मध्ये आलेल्या 'सत्ते पे सत्ता' चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता या चित्रपटाचा रिमेक येण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात हेमा मालिनी यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी दीपिकाचं योग्य पर्याय असून, हेमा मालिनी यांची सुंदरताही दीपिका पडद्यावर योग्य प्रकारे साकारु शकते अशी प्रतिक्रिया फराह खान आणि रोहित शेट्टी यांनी दिली.
'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकमधून हृतिक-दीपिका ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हृतिक आणि दीपिका ही जोडी खरंच चित्रपटासाठी निश्चित करण्यात आली तर प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.
सध्या दीपिका रणवीरसोबत '८३' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दीपिका तिच्या आगामी 'छपाक' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हृतिक 'सुपर ३०' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर हृतिक, टायगर श्रॉफसह एका अॅक्शन चित्रपटातून भूमिका साकारणार आहे.