#govote नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना दीपिकाची चपराक
दीपिकाने लिहिलेली इंन्स्टाग्रामवरील ही पोस्ट वाचाच...
मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ साठी चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी घेण्यात आलं. बॉलिवूडमधील अनेक कलाकार विविध कारणांनी लोकसभा निवडणूक २०१९ साठी मतदान करु शकत नसल्याचं समोर आलं होतं. यात अक्षय कुमार, आलिया भट्टसह दीपिका पादुकोणच्याही नावाचा समावेश होता. दीपिका पादुकोणचा जन्म डेन्मार्कचा असल्यानं तिच्याकडे दानिश पासपोर्ट आहे, तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नसल्याची चर्चा होती. परंतु २९ एप्रिल रोजी झालेल्या चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक २०१९ साठी दीपिकाने मतदान केलं आहे. मतदानानंतरचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट करत मतदान करु शकत नसल्याच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
दीपिकाने मतदान केल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. मी कोण आहे, मी कोणत्या भागातून आली आहे. याबाबत मला जराही साशंकता नाही परंतु ज्यांना माझ्या नागरिकत्वावर शंका आहे त्यांनी देखील घेऊ नये असं तिनं म्हटलं आहे. दीपिकाच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना तिनं या फोटोतून उत्तर दिलं आहे.
२०१४ साली झालेल्या आयफा (IIFA) पुरस्कार सोहळ्यात दीपिकाने तिच्या पासपोर्टबाबत असलेल्या अफवांवर खुलासा केला होता. तिच्याकडे भारताचा पासपोर्ट असल्याचा खुलासा तिने यावेळी केला होता. पासपोर्टबाबत एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दीपिकाने 'तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. तुम्हाला अशी माहिती कोणी दिली, कुठून मिळाली?' असा सवालही तिने पत्रकाराला केला होता. आपल्याकडे भारताचा पासपोर्ट असून 'मला भारताची नागरिक असल्याचा अभिमान असल्याचं' तिने या मुलाखतीत म्हटलं होतं.