Pathan Controversy : बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (deepika padukone) यांचा बहुचर्चित पठाण चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यामध्ये दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे हिंदुत्ववादी संघटनांसह भाजप नेते आक्रमक झाले आहेत. पठाण चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी आता हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच दीपिका पदुकोणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणवीर सिंग आणि दीपिका यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातील हा व्हिडीओ आहे. दीपिकाच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला आहे. दीपिकाचे चाहतेही पठाणच्या समर्थनात उतरले आहेत.


काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?


"हे खरं आहे की प्रत्येक धर्माने एक रंग निवडला आहे. पण रंगाचा कोणताही धर्म नसतो. माणसाला जेव्हा रंगातही धर्म दिसायला लागतो तेव्हा त्याचं मन नक्कीच काळे व्हायला लागतं. देवीच्या मृर्तीला सजवण्यासाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि चोळी घातली जाते हे तुम्ही विसरला आहात. दर्ग्यातही भगव्या रंगाच्या चादरी चढवल्या जातात तेव्हा रंगाचा विचार केला जात नाही," असे दीपिका या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.



सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे - शाहरुख खान


कोलकाता येथे पार पडलेल्या 28 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना शाहरुख खानने कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यासोबत शाहरुख खानचे एक ट्विटसुद्धा व्हायरल होत होते. "ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले, ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे बता तेरी रज़ा क्या," असे शाहरुखने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.


बेशरम असा कुठला रंगच नसतो - रामदास आठवले


केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली होती.  "बेशरम म्हणून कुठला ही रंग नसतो. तो शब्द काढला नाही तर आम्ही देखील आंदोलन करु," असा इशारा रामदास आठवले यांनी दिला होता.