मुंबई : अगोदर मॉडल आणि नंतर अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर आलेला निहार पांड्या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमातून निहारनं बॉलिवूड डेब्यू केलाय. यापूर्वीही निहार पांड्या अभिनेत्री दीपिका पादूकोण हिच्यासोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा नातेसंबंधांसाठी तो चर्चेत आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, निहार लवकरच बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गायिकेसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निहारच्या लग्नाची तारीखही समोर आलीय. खुद्द निहारनंच एका प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रमात आपल्या लग्नाची तारीख जाहीर करून टाकलीय. 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात आपल्या 'लेडी लव्ह'ला प्रपोजही केलंय. 



निहार गायिका नीति मोहन हिच्यासोबत विवाहबंधनात अडकतोय. निहार आणि नीति या दोघांनी नुकतीच कपिल शर्माच्या कार्यक्रमात हजेरी लावली. एका म्युझिक बँडमध्ये एकत्र काम करताना या दोघांची ओळख झाली होती. परंतु, वर्षभरापूर्वी एका मित्राच्या लग्नात पुन्हा दोघं एकमेकांसमोर आले आणि तिथूनच या लव्हस्टोरीला प्रारंभ झाल्याचंही यावेळी, निहारनं सांगितलंय. 


नीति आणि निहार येत्या १४ फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला विवाहबंधनात अडकणार आहेत. 



जवळपास १३ वर्षांपूर्वी निहार पांड्या अभिनेत्री दीपिका पादूकोण हिच्यासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आला होता. शाळेत झालेल्या ओळखीनंतर हे दोघे प्रेमात पडले होते... परंतु, काही वेळानंतर या दोघांनीही आपलं नातं संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला होता. दीपिकाबद्दल आता आपल्या मनात कोणताही कडवटपणा नसल्याचंही निहारनं नुकतंच स्पष्ट केलंय.