मुंबई : बॉलिवूडची डिंपल गर्ल दीपिका पादुकोण (deepika padukone) हिला काल रात्री अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे आता तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. पण दीपिकाची तब्येत बिघडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण दीपिकाच्या बाबतीत असे वारंवार का घडते असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. (Deepika padukone hospitalized)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाची प्रकृती खालावल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रिपोर्टनुसार, आता तिची तब्येत सुधारत आहे आणि चाहत्यांनीही अभिनेत्री बरी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हृदयाची धडधड वाढणे किंवा हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्यांमुळे दीपिकाला यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी दीपिका हैदराबादमध्ये प्रभाससोबत तिच्या आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर दीपिकाला हार्ट अरिथमिया नावाचा आजार आहे, ज्यामुळे यापूर्वी अनेक सेलिब्रिटींचा मृत्यू झाला आहे.


हा आजार किती धोकादायक ?


दीपिकाला झालेल्या या आजाराला हार्ट अरिथमिया (Heart arrhythmia) म्हणतात. हा एक हृदयविकार आहे ज्यामध्ये हृदयाच्या ठोक्यांची गती आणि लय बिघडते. हृदयाच्या या गती आणि लय मागे हृदयाची विद्युत प्रक्रिया असते, जी विद्युत आवेग चालवते. हृदयाचे विद्युत आवेग विहित मार्गातून जातात. हे सिग्नल हृदयाच्या स्नायूंच्या क्रियाकलापांमध्ये समन्वय साधतात, ज्यामुळे हृदय आरामात रक्त आत आणि बाहेर पंप करू शकते. परंतु जेव्हा ही समस्या मेंदू, फुफ्फुसे, हृदय किंवा इतर आवश्यक अवयवांमध्ये रक्तप्रवाहात समस्या निर्माण करते, तेव्हा ते जीवघेणे देखील ठरू शकते.


रोगाची लक्षणे आणि कारणे काय ?


लक्षणांबद्दल बोलायचं झाले तर हृदयाचे ठोके चुकणे, मान किंवा छातीत फडफडणे, वेगवान किंवा मंद हृदय गती, अनियमित हृदय गती आहे. याशिवाय छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मूर्च्छा येणे, थकवा येणे, जास्त घाम येणे ही लक्षणेही जाणवतात. याचे कारण उच्च रक्तदाब, नैराश्य, व्यायाम, तणाव किंवा चिंता ते ऍलर्जी, सर्दी असे असू शकते.


दीपिका पदुकोणच्या टीमकडून तिच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी 'पठाण' चित्रपटाच्या डबिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी तिने डबिंग स्टुडिओचा एक फोटोही शेअर केला होता, ज्यामध्ये माईक आणि चित्रपटाची स्क्रिप्टही दिसत होती. 'पठाण'मध्ये ती तिसऱ्यांदा शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यात जॉन अब्राहमचीही भूमिका आहे. दीपिका हृतिक रोशनसोबत 'फाइटर' चित्रपटात काम करताना दिसणार आहे.