मुंबई : छोट्या पडद्यावरील 'देवमाणूस' या मालिकेत टायटल रोल साकारत डॉक्टरच्या रूपात महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेला किरण गायकवाड मागील बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर रमला आहे. डीजे ते मुख्य अभिनेत्याचा किरणचा अभिनयातील प्रवास नवोदितांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. याच किरणला सध्या कोणाचा तरी 'नाद' लागला आहे. हा 'नाद' कोणाचा आहे हे लवकरच समजेल, पण 'नाद - द हार्ड लव्ह' असं शीर्षक असलेल्या किरणच्या आगामी मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त झाला असून, चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर या निर्मिती संस्थांतर्गत 'नाद'ची निर्माती करण्यात येत आहे. संजय बाबुराव पगारे आणि रुपेश दिनकर पगारे या चित्रपटाचे निर्माते असून, दिग्दर्शनाची धुरा 'मिथुन', 'रांजण', 'बलोच' फेम प्रकाश जनार्दन पवार यांनी सांभाळली आहे. भोरमध्ये 'नाद'च्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी निर्मात्यांनी मुहूर्ताच्या शॉटसाठी क्लॅप दिला आणि चित्रीकरणाला सुरुवात झाली. 'नाद - द हार्ड लव्ह' या शीर्षकावरूनच ही एक लव्ह स्टोरी असल्याचं समजतं. आजवर बऱ्याच दिग्दर्शकांनी आपापल्या परीने प्रेमकथा सादर करत रसिकांचं मनोरंजन केलं असलं तरी प्रत्येक चित्रपटात प्रेमाचा एक वेगळाच रंग पाहायला मिळतो.


'नाद' या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याचं गुपित सध्या गुलदस्त्यात आहे. किरण गायकवाड हा प्रचंड ताकदीचा अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणं हि या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. नायकाच्याच नव्हे, तर खलनायकी भूमिकाही अगदी सहजपणे साकारण्याची हातोटी किरणकडे आहे. या चित्रपटातील नायक किरण कशा प्रकारे साकारतो हे पहाणं प्रेक्षकांसाठी आणि विशेषत: त्याच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. 


'नाद'बाबत दिग्दर्शक प्रकाश पवार म्हणाले की, या चित्रपटात प्रेक्षकांना आजवर कधीही न पाहिलेली प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. विविध छटा असलेल्या या लव्हस्टोरीमध्ये नातेसंबंधांचे विविध रंगही दिसतील. 'नाद' असं शीर्षक असलेला हा चित्रपट एकप्रकारे प्रेमासोबतच मानवी भावभावनांचा आलेखच मोठ्या पडद्यावर सादर करणार आहे. यासाठी किरण गायकवाडसारखा तगड्या अभिनेत्याची आम्हाला गरज होती. पटकथा आणि कॅरेक्टर ऐकवताच त्याला ते भावलं आणि त्याने होकार दिला. किरणच्या जोडीला सपना माने ही नवोदित अभिनेत्री झळकणार असल्याचेही पवार म्हणाले.


'नाद'ची कथा संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी लिहिली असून, पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. डॉ. विनायक पवार यांनी वैभव देशमुख यांच्या साथीने गीतलेखनही केलं असून, त्यांच्या संगीतरचना संगीतकार पंकज पडघम यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. डिओपी अमित सिंह या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करत असून, कला दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश चिपकर यांनी सांभाळली आहे. वेशभूषा निगार शेख यांनी केली असून, कोरिओग्राफर सिद्धेश दळवी आहेत. आमिरा शेख या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह हेड असून, सुजित मुकटे कार्यकारी निर्माते आहेत.