दिलीप कुमार यांच्या भावाचं करोनामुळे निधन
देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २९,०५,८२४ इतका झाला आहे.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा लहान भाऊ अस्लम खान यांचा कोरोना मुळे निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झााला. अस्लम खान यांच्या शिवाय दिलीप कुमार यांचा आणखी एक भाऊ एहसान खान (९० वर्ष) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
दोघांनाही उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु अस्लम खान यांचा या धोकादायक विषाणूने बळी घेतला. अस्लम खान यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयसंबंधीत काही समस्यादेखील होत्या, असं सांगण्यात येत आहे.
दरम्यान देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ६८,८९८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २९,०५,८२४ इतका झाला आहे.