दिलवाले सिनेमाची झलक `या` मराठी सिनेमांत
आजवर मराठी चित्रपटात हिंदी चित्रपटातल्या गाण्यांच्या चाली, शब्दांचा वापर झाला आहे. मात्र,
मुंबई : आजवर मराठी चित्रपटात हिंदी चित्रपटातल्या गाण्यांच्या चाली, शब्दांचा वापर झाला आहे. मात्र,
नव्वदच्या दशकात गाजलेल्या "दिलवाले" या चित्रपटातील सीन्स रितसर परवानगी घेऊन "चिठ्ठी" या चित्रपटात वापरण्यात आले आहेत. "चिठ्ठी" या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियात लाँच करण्यात आला असून, त्यातून नॉस्टेल्जिक अनुभव मिळत आहे. या चित्रपटातून अभिनेत्री धनश्री काडगावकर आणि अभिनेता शुभंकर एकबोटे ही नवीन फ्रेश जोडी आपल्या भेटीला येणार आहे.
डांगे एंटरटेन्मेंटच्या विशाल डांगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती ही त्यांनीच केली आहे. वैभव काळुराम डांगे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून स्वरदा बुरसे आणि सुजय जाधव यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे."चिट्ठी" चित्रपटात एक धमाल प्रेमकथा पहायला मिळणार आहे. एका तरूणानं त्याच्या प्रेयसीला पाठवलेली "चिठ्ठी" तिला मिळतच नाही आणि त्यानंतर काय गोंधळ होतो, या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे.
नव्वदचे दशक "दिलवाले" या चित्रपटानं गाजवलं होतं. त्यातले संवाद, गाणी आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. आमच्या चित्रपटाच्या कथानकात "दिलवाले"चा महत्त्वपूर्ण संदर्भ आहे. कारण या चित्रपटातील अभिनेत्यावरही या दिलवालेचा प्रभाव झाला आहे. त्यामुळे चित्रपट धमाल झाला आहे. प्रेक्षक ते प्रसंग नक्कीच एन्जॉय करतील,' असं दिग्दर्शक वैभव डांगे यांनी सांगितलं.
अभिनेत्री धनश्री काडगावकर, अभिनेता शुभंकर एकबोटे यांच्यासह अश्विनी गिरी, नागेश भोसले, अक्षय टांकसळे, श्रीकांत यादव, राजेश भोसले आणि काही बालकलाकार ही या चित्रपटात आहेत."चिठ्ठी" हा चित्रपट १९ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.