फरहान अख्तरने डिलिट केलं फेसबूक अकाऊंंट
अल्पावधीत जगभरात लोकप्रियता मिळावलेल्या ` फेसबुक`वर सध्या टीका होत आहे.
मुंबई : अल्पावधीत जगभरात लोकप्रियता मिळावलेल्या ' फेसबुक'वर सध्या टीका होत आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकवर वैयक्तिक माहिती लीक होत असल्याची माहिती समोर आली.फेसबुक युजर्स डेटा लीकप्रकरणी सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयातर्फे शुक्रवारी कॅंब्रिज एनालिटीकाला नोटीस जारी केली आहे. ३१ मार्च पर्यंत या नोटीसचे उत्तर देण्यास सांगितले आहे. युजर्सची वैयक्तिक माहिती घेऊन त्याचा उपयोग मतदानासाठी करण असा गंभीर ठपका याप्रकरणात ठेवण्यात आलाय. भारतीयांच्या खाजगी माहितीचा दुरूपयोग आणि त्यांच्या करण्याच्या पद्धतीवर प्रभाव टाकण्यासंदर्भात सरकारने कॅंम्ब्रिज अॅनालिटीकाला प्रश्न विचारले.
झुकरबर्गचा माफिनामा
पाच कोटी फेसबुक यूझर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर झाल्याप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं माफीनामा सादर केलाय. फेसबुकच्या यूझर्सनी शेअर केलेली माहिती जपण्याची जबाबदारी कंपनीची आहे. जर, अशी माहिती लीक झाली असेल, तर ती कंपनीची चूक आहे. असं झुकरबर्गनं त्याच्या फेसबुक पेजवर म्हटलंय. फेसबूकवर डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी 'हा'मार्ग मूळीच वापरू नका
अनेक सेलिब्रिटी गेले फेसबूकपासून दूर
सध्या फेसबुक एका कठीण टप्प्यातून जात आहे. दरम्यान लक्झरी कार कंपनी 'टेस्ला' आणि 'स्पेसएक्स'चे मालक इलोम मास्क, जिम कॅरी यासारखे अनेक सेलिब्रिटी फेसबूकपासून दूर गेले आहेत. त्यानंतर आता बॉलिवूड कलाकार फरहान अख्तरनेही त्याचं अकाऊंट डिलिट केलं आहे.
ट्विटरच्या माध्यमातून माहिती
ट्विटरच्या माध्यमातून फरहान अख्तरने त्याचं पर्सनल अकाऊंट डिलिट केल्याची माहिती दिली आहे. फरहान अख्तरने नेमकं अकाऊंट का डिलिट याचं कारण दिलेलं नाही. मात्र त्याचं व्हेरिफाईड पेज (FarhanAkhtarLive)अॅक्टीव्ह असल्याची माहिती दिली आहे.
#DeleteFacebook अभियान सुरू
जगभरातील अनेक सेलिब्रिटी आणि सामान्यांनी फेसबुकवर वैयक्तिक माहिती सुरक्षित नसल्याचं समजताच त्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. #DeleteFacebook हे अभियान सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. सेलिब्रिटींनी याद्वारा फेसबुक अकाऊंट डिलिट करण्याचं आवाहन केलं आहे.