बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने (Arshad Warsi) प्रभासला (Prabhas) जोकर (Joker) म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'Kalki 2898 AD' चित्रपट आपल्याला फारसा आवडला नाही सांगताना अर्शद वारसीने अमिताभ यांचं तोंडभरुन कौतुक केलं. त्यांच्या वयात आपण असं काम करु शकू की नाही याबाबत त्याने शंकाही व्यक्त केली. दुसरीकडे त्याने प्रभास मात्र चित्रपटात जोकर वाटत होता असं म्हटलं. दिग्दर्शक त्याला असं का करतात? अशी खंतही त्याने मांडली. दरम्यान दिग्दर्शक अजय भुपतीने अर्शद वारसीच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजय भुपती 'RX 100' आणि मंगलावरमसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. अर्शद वारसीने केलेल्या विधानानंतर त्याने प्रभासची बाजू मांडली आहे. अर्शद वारसीच्या विधानावर टीका करताना त्याने एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिलं आहे की, "प्रभास असा व्यक्ती आहे ज्याने आपलं सर्वस्व दिलं आहे आणि भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी काहीही करु शकतो. तो आपल्या देशाचा अभिमान आहे".


यावेळी त्याने अर्शद वारसीवर टीका करताना म्हटलं आहे की, "आम्ही त्या चित्रपटाबद्दलची ईर्षा तुमच्या डोळ्यात पाहू शकतो. कारण तुम्ही निस्तेज झाला आहात आणि कोणीही तुमच्याकडे लक्ष देत नाही. आपले मत व्यक्त करण्याची एक मर्यादा आणि मार्ग आहे. असं दिसतंयी की तुम्ही तेच आहात जे तुम्ही त्याच्याबद्दल सांगितलं आहे".



अर्शद वारसी नेमकं काय म्हणाला?


"मी कल्की पाहिला, मला आवडला नाही. अमितजींनी आजवर खूप चांगलं काम केलं. मी त्या माणसाला कधीच समजू शकत नव्हतो. खरंच बोलतोय जर आपल्यात त्या माणसाइतकी ताकद असेल, तर आयुष्यात आपण कुठेच थांबणार नाही. ते अनरियल आहेत," असं कौतुक करताना अर्शदने प्रभासला जोकर म्हटलं. 


"प्रभास, मला फार वाईट वाटत आहे. पण तो असा जोकरसारखा का दिसत होता? मला त्याला मॅड मॅक्स, मेल गिस्बनसारखं पाहायचं आहे. तुम्ही त्याला काय बनवलं. तुम्ही त्याला काय बनवलं. दिग्दर्शक असं का करतात? हे मला समजत नाही," असंही तो म्हणाला. 'कल्की 2898 एडी' नाग अश्विनने दिग्दर्शित केला होता आणि त्यात दीपिका पदुकोण देखील मुख्य भूमिकेत होती.