फराहच्या पूजा करणाऱ्या मुलांच्या फोटोवर प्रश्नचिन्ह, मिळालं सडेतोड प्रत्यूत्तर...
फराह खानच्या तीन मुलांचा पूजा करतानाचा फोटो पाहून कट्टरतावादी सोशल मीडियावर तुटून पडले
मुंबई : एखाद्या बॉलिवूड सेलिब्रिटीला सोशल मीडियावर ट्रोल केलं जाणं काही नवीन गोष्ट नाही... त्यातच जर सेलिब्रिटींनी धर्माशी निगडीत किंवा इतर गोष्टींशी निगडीत आपली मतं सोशल मीडियावर व्यक्त केली तर ते लगेचच ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात... असाच काहिसं घडलंय सिनेनिर्माती-अभिनेत्री फराह खान हिच्याबाबतीत... नुकताच फराहनं आपल्या तिनही मुलांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत तिन्ही चिमुरडी हात जोडून पूजा करताना दिसत आहेत... या फोटोसह फराहनं नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. हा फोटो शेअर करताना तिनं कधी विचारही केला नसेल की हा फोटोही ट्रोल होऊ शकतो.
पण, फराहच्या तीन मुलांचा पूजा करतानाचा फोटो पाहून कट्टरतावादी सोशल मीडियावर तुटून पडले. काहिंनी नवीन वर्ष सेलिब्रेट करणंच चुकीचं असल्याचं सांगितलं... तर काहिंनी फराह आपल्या धर्मातून भटकल्याचं म्हटलं...
यावर झी न्यूजशी बोलताना फराहनं टीकाकारांना सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय. 'ती माझी इन्स्टावॉल आहे. माझ्या मुलांचे कसे फोटो पोस्ट करायचेत हा निर्णय माझा आहे. मला याबाबतीत कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही. हा त्या लोकांचा प्रश्न आहे ज्यांनी त्या फोटोवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. आत २०१९ उजाडलंय... या गोष्टी आता मागे पडल्यात' असं फराहनं यावेळी म्हटलंय.
फराह खाननं सिनेनिर्माता शिरीष कुंदर याच्याही विवाह केलाय. या दोघांची मुलं हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्माच्या परंपरा समजून घेत मोठी होत आहेत. फराह आणि शिरीष यांना तीन मुलं आहेत.